नवी दिल्ली - देशामध्ये गेल्या वर्षी हवामानाच्या आत्यंतिक स्थितीमुळे विशेष करून उष्णतेने, उष्माघाताने १६00 पेक्षा अधिक लोकांचे बळी गेले आहेत. तसेच पूर, वीज पडल्याने बळी जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. उष्माघाताने ४0 टक्के लोक मरण पावले असून त्या खालोखाल पूर व वीज पडल्याने मरण पावलेल्या बळींची संख्या ४७५ इतकी आहे.
भारतीय हवामान विभागाने नोंदवलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षामधील उन्हाचे व उष्णतेचे प्रमाण हे विक्रमी आहे. जगामध्येही ते विक्रमी असून राजस्थानात फालोदी येथे ५१ अंश सेल्सियस इतके तापमान नोंद झाले होते. भारतामध्ये नोंद झालेले हे सर्वाधिक उच्च तापमान आहे. जानेवारी व फेब्रुवारी हे दोन महिने गेल्या वर्षी अनुभवले गेले, ते हिवाळ्यातील सर्वात उबदार महिने म्हणून. १९0१ पासून नोंदल्या गेलेल्या तापमान नोंदीनुसार गतवर्षात हवामानाची स्थिती आत्यंतिक असल्याचा अनुभव आहे.
हवामानाच्या या अतिरेकी प्रमाणामुळे बिहार, गुजरात व महाराष्ट्रात ५५२ इतके मृत्यू नोंदवले गेले असून हे प्रमाण एकूण बळींच्या तुलनेत ३५ टक्के आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेशात उष्माघाताने ४00 पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले, तर देशात ७00 पेक्षा अधिक लोक उष्माघाताचे बळी आहेत. गुजरात व महाराष्ट्रात अनुक्रमे ८७ व ४३ इतके मृत्यू उष्माघाताने झाले आहेत. थंडीच्या लाटेने देशात ५३ जणांचे बळी गेले. वीज पडून मरण पावणार्यांचे प्रमाणही कमी नाही. बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वीज पडून ४१५ पेक्षा अधिकांचे मृत्यू झाले. त्यात ओडिशात १३२ पेक्षा अधिक जणांना याच कारणाने प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रात वीज पडून ४३ जण मरण पावले.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक के. जे. रमेश यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमुळे प्राणहानी कमीत कमी व्हावी यासाठी आम्हीही विविध मार्गांनी प्रयत्न करत असतो, लोकांना त्याबाबतची माहिती पुरवत असतो. अंदाज व्यक्त करत असतो.