सातारा - बहुजन क्रांती मोर्चाचे निळे वादळ रविवारी सातार्यात धडकले. या मोर्चात जिल्ह्यातील बहुजनांनी सहभाग घेतला होता. अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र न्यायालय व स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी, लोकसंख्येच्या प्रमाणात इतर समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्या या मोर्चामध्ये करण्यात आल्या.
सातारा पालिकेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा राजपथावरून मोती चौक मार्गे राधिका रोड, सातारा मध्यवर्ती बसस्थानक मार्गे पोवई नाक्यावर आला. यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक जीवन भालेराव यावेळी म्हणाले, ‘हा मोर्चा बहुजनांचे हक्क अधिकाराची लढाई लढण्यासाठीच मैदानात उतरला आहे. या मोर्चाने अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, मुस्लीम, लिंगायत, ख्रिश्चन आदी बहुजन समाजाने एकत्र येऊन संघटित केले आहे. हा लढा असाच कायम ठेवल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजन समाजाचाच असेल. दोन समाजांमध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरू केले आहेत. ते मिटवून समाजामध्ये सलोखा राखण्याचे काम बहुजन क्रांती मोर्चाने केले आहे. या मोर्चाद्वारे असंघटित समाजाला संघटित केले आहे. अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक झाला पाहिजे, भटके विमुक्तांनाही या कायद्यांतर्गत संरक्षण मिळाले पाहिजे, ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे, दहशतवादाच्या नावावर अटक करण्यात आलेल्या निरपराध मुस्लिमांची सुटका झाली पाहिजे,’ अशा मागण्याही भालेराव यांनी यावेळी केल्या.
बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. अनिल माने, अमोल बनसोडे, तुषार मोतलिंग, सतीश रावखंडे, आयेशा पटणी, तेजस माने, आनंदराव लादे आदी उपस्थित होते.संयोजन समितीचे डॉ. अनिल माने यांनी प्रास्ताविक केले. आम्रपाली गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब ओव्हाळ यांनी आभार मानले.