रविवारी एसबीआयने केलेल्या या घोषणेमुळे गृह, वाहन आणि अन्य वैयक्तिक कर्ज व्याजदरातही घट होणार आहे. एसबीआयने एका दिवसासाठीच्या कर्ज व्याजदराला कमी करत 8.65 टक्क्यांवरून 7.75 टक्क्यांवर नेले. एका वर्षापूर्वी 8.90 टक्के असणारा हा दर आता आगामी एका वर्षासाठी 8 टक्क्यांवर आला आहे. बँकेच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा महिला ग्राहकांना होणार आहे. महिलांना 8.20 टक्के आणि अन्य ग्राहकांना 8.25 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहेत. 75 लाखापर्यंतच्या गृहकर्जावर महिलांना 8.2 टक्के व्याजदर द्यावे लागेल. यापूर्वी त्यांना 9.10 टक्के व्याजदर आकारले जात होते. एसबीआयनंतर युनियन बँकेने 0.65 टक्के ते 0.90 टक्क्यांपर्यंत कर्ज व्याजदरात कपात केली.
नोटाबंदी करण्यात आल्यानंतर बँकांजवळ मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम जमा झाली आहे. एसबीआयने एमसीएलआर दोन वर्षांसाठी 0.9 टक्क्यांनी कमी करत 8.10 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.15 टक्के केला. 31 डिसेंबरला पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलेल्या भाषणात बँकांनी गरीब आणि मध्यम वर्गावर जास्त प्रमाणात लक्ष्य केंद्रीत करावे असे आवाहन केले होते. याचप्रमाणे गेल्या आठवडय़ात अर्थ मंत्रालयाने व्याजदरात कपात करण्यास सांगितले होते.