मुंबई, दि. 2 Jan 2017 - ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान’ सर्व शाळांमध्ये 3 जानेवारी ते26 जानेवारी 2017 दरम्यान शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख शाळांतील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्यांची प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान दरवर्षीप्रमाणे 3 जानेवारी ते 26जानेवारी 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार, प्रत्येक बालकास समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची तरतूद करण्याची जबाबदारी राज्य शासनाकडे सोपविण्यात आली आहे. यानुसार राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे,मुलींच्या शिक्षणाला गती देणे, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणे,मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जा देणे, परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे, स्थलांतरित पालकांच्या मुलींच्या अखंडीत शिक्षणाची हमी देणे, मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणे व त्यांच्यात आत्मविश्वास रुजविणे, वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे,शारिरीक क्षमता वाढीस लावणे, त्यांच्या सृजनशीलतेस वाव देणे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थीनींची गळती कमी करणे यासाठी या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या उद्देशाने महिला शिक्षणास सुरुवात केली, तो उद्देश केंद्रीभूत ठेऊन लेक शिकवा या अभियानाअंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201612301614465721 असा आहे.