४७ वर्षांपासूनची मागणी शासनाकडून मान्य
मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईसह राज्यातील रात्रशाळेत शिकविणाऱ्या अर्धवेळ शिक्षकांनाही आता निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार असून याबाबत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले
याबाबत आमदार रामनाथ मोते, माजी आमदार संजीवनी रायकर व शिक्षक परिषद समर्थित रात्रशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने पाठपुरावा केला होता. या निर्णयाचा फायदा मुंबईसह राज्यातील १७६ रात्रशाळेतील फक्त रात्रशाळेतच अर्धवेळ काम करणाऱ्या ५९१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. रात्रशाळेत अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेतून निवृत्त झाल्यावर कोणत्याही सेवा व सुविधा मिळत नसल्याने हलाखीचे जीवन जगावे लागत होते . हि बाब रात्रशाळा संघटनेचे निरंजन गिरी व सुनील सुसरे यांनी आमदार रामनाथ मोते, आमदार संजीवनी रायकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यावर या दोन्ही आमदारांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. रात्रशाळेच्या संदर्भात नेमल्या गेलेल्या समितीमध्ये अर्धवेळ शिक्षकांना पेन्शन मिळावे हि शिफारस आमदार मोते व रायकर यांनी शासनाला केली होती.
अखेर शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना भारत सरकारच्या १९८२ च्या कायदयानुसार भविष्य निर्वाह निधी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्धवेळ शिक्षकांसाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे रात्रशाळा संघटनेने आभार मानले असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.