मुंबई / अजेयकुमार जाधव
पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आज ११ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मुंबईसह १० महानगर पालिका, राज्यातील २५ जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणुकीची घोषणा केली जाणार असून निवडणुकीच्या तारखा व कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून त्वरित आचारसंहिता लागणार असल्याने महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल आज पासून वाजणार आहे.
निवडणुकीच्या दिवशी मतदार मतदानाला उपस्थित ना राहता बाहेर फिरायला जात असल्याने निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण फार कमी झाले आहे. यामुळे मतदान जास्त व्हावे म्हणून निवडणूक आठवड्याच्या मधल्या दिवशी घेतली जाणार आहे. ज्या दिवशी मतदान होणार आहे त्याच्या आजूबाजूला सुट्टी नसेल याची काळजी घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ नियमाप्रमाणे १० मार्चला संपत आहे. त्या आधी निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे. निवडणुकीनंतर कोंकण आयुक्तांकडे गट स्थापन करणे त्यानंतर ९ मार्च पर्यंत नवा महापौर निवड करावी लागणार आहे. त्यासाठी लागणार कालावधी पाहता फेब्रुवारीच्या शेवटून दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांची तारिख जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबई महापालिकेच्या निवडणूका २१ किंवा २२ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.