जोगेंद्र कवाडे यांनी रिपब्लिकन गटांना एकत्र करीत ‘रिपब्लिकन फ्रंट’ स्थापन केला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 January 2017

जोगेंद्र कवाडे यांनी रिपब्लिकन गटांना एकत्र करीत ‘रिपब्लिकन फ्रंट’ स्थापन केला

नागपूर = पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रिपब्लिकन गटांना एकत्र करीत ‘रिपब्लिकन फ्रंट’ स्थापन केला आहे. या फ्रंटच्या माध्यमातून महापालिलका निवडणुकीत ७५ जागा लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे. तशी घोषणा त्यांनी केली.

सर्व आंबेडकरी राजकीय कक्षांची मोट बांधल्यामुळे नवे राजकीय समीकरण उदयास येते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आंबेडकरी पक्षांचा हा फ्रंट काँग्रेसला समर्थन देणार की वेगळे अस्तित्व दाखविणार, असाही प्रश्न या निमित्त उपस्थित झाला आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यासाठी तर हा फ्रंट तयार करण्यात आला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एरव्हीच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांकडे वळणारी व त्यामुळे विखुरणारी आंबेडकरी मते या फ्रंटच्या निमित्ताने एकत्रित आली असली तरी आपले राजकीय अस्तित्व ते कसे निर्माण करतील व बहुजन समाज पक्षासमोर कसे आव्हान निर्माण करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रविभवन येथे गुरुवारी आयोजित पत्र परिषदेत कवाडे म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने विविध रिपब्लिकन गट एकत्र आले आहेत. रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी संघटनांना आणखी सोबत जोडण्यात येणार आहे. ज्यांना या फ्रंटमध्ये यायचे आहे, त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. इतर पक्ष किंवा आघाड्यांशी सुद्धा चर्चा केली जाईल. निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. अनुसूचित जाती, जमाती यांच्यासह ओबीसी, अल्पसंख्याक, मुस्लीम आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सुद्धा संधी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपुरात ज्या पद्धतीने विविध रिपब्लिकन गटांनी एकत्र येऊन रिपब्लिकन फ्रंट तयार केला आहे, त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यात जिथे-जिथे निवडणुका होऊ घातल्या आहेत. तिथे याच प्रकारचा फ्रंट तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही कवाडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला ज्येष्ठ नेते अमृत गजभिये, हरिदास टेंभुर्णे, इ.मो. नारनवरे, प्रकाश कुंभे उपस्थित होते.

असा आहे ‘फ्रंट’
सध्या फ्रंटमध्ये रिपाइं (गवई), रिप (खोरिपा), रिपब्लिकन सेना, रिपाइं एकतावादी, रिप (खोब्रागडे), रिप (खोरिप), ऐक्यवादी रिपाइं, समता सैनिक दल, रिपब्लिकन ऐक्य परिषद, रिपब्लिकन आंदोलन, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपाइं (राजाभाऊ खोब्रागडे) आदी १२ पक्ष व संघटना.

प्रकाश आंबेडकरांना एकीकरणाची अ‍ॅलर्जी का?रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा प्रयत्न जेव्हा-जेव्हा होतो तेव्हा-तेव्हा भारिप बहुजन महसंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रिपाइंच्या एकीकरणाची अ‍ॅलर्जी का, असा प्रश्न प्रा. कवाडे यांनी उपस्थित केला. रिपब्लिकन फ्रंट संदर्भात आपण उपेंद्र शेंडे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच काँग्रेस-भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा सोबत यावे, त्यांचे स्वागतच आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

२५ पासून उमेदवारांच्या मुलाखतीयेत्या २० जानेवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांनी ‘रिपब्लिकन फ्रंट’च्या कार्यालयात अर्ज सादर करावेत. २५ तारखेपासून मुलाखती घेण्यात येतील. २७ जानेवारीला उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यासोबतच फ्रंटचा वचननामा सुद्धा प्रसिद्ध केला जाईल. शैक्षणिक पात्रता, प्रभागातील कार्य, चळवळीला दिलेले योगदान, आर्थिक क्षमता आणि ‘रिपब्लिकन फ्रंट’ प्रति त्याची निष्ठा हे निकष उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आले आहेत.

Post Bottom Ad