मुंबई : रेल्वे अपघात हे सर्वात जास्त रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना होत आहेत. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडणार्यांविरोधात मध्य रेल्वेच्या आरपीएफने (रेल्वे सुरक्षा दल) गेल्या वर्षी कठोर करावाई केली आहे. या कारवाईमध्ये २६७३३ जणांनी रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याचा गुन्हा केला आहे. यंदाच्या वर्षी देखील ही कारवाई आणखी कठोर करण्यात येणार आहे.
रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्यासोबतच आरक्षित डब्यात घुसखोरी, अनधिकृत फेरीवाले इत्यादी गुन्ह्यांची देखील नोंद करण्यात आलेली आहे. रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना मोठय़ा प्रमाणात अपघात होतात आणि हे अपघात कमी करण्यासाठी गेल्या वर्षी नियमित मध्य रेल्वेकडून मोठय़ा प्रमाणात विशेष मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना ट्रेनच्या धडकेत १६५३ जणांचा मृत्यू झाला तर ३४८ जण जखमी झाले. २0१५ मध्ये ठार झालेल्यांचा हाच आकडा १८0१ तर जखमींचा ४६८ होता. गेल्या वर्षभरात १६७५१ जणांवर कारवाई करताना त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून २८ लाख ८७ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. तसेच ४0९0६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून एक कोटी ९४ लाखांचा दंडही वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवास करणार्या ३ लाख ९९ हजार ८८१ प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून १२ कोटी ३८ लाख ४८ हजार ८२२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.
कुर्ला, ठाणे, कल्याण, वाशी, बोरिवली, वसई, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक अपघातांची नोंद आहे. त्यानुसार, इतर स्थानकांबरोबरच या हद्दीत जास्त लक्ष केंद्रित करून रेल्वेट्रॅक क्रॉस करणार्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरक्षित महिला डब्यात घुसखोरी करणार्या प्रवाशांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.