नाशिक : अरबी समुद्रात शिवस्मारकाची उभारणी निव्वळ निवडणूक स्टंट असून भाजपाकडून दाखवले जात असलेले चित्र केवळ संकल्पना मात्र आहे. त्याचा वस्तुस्थितीशी काहीएक संबंध नाही, समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट (शक्यता पडताळणी अहवाल)च शासनाने तयार केला नसल्याचा गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या स्मारकाच्या लोकार्पणानिमित्त नाशिक दौर्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी अनौपचारिक गप्पा मारताना राज यांनी भाजपा सरकारवर पुन्हा टीकास्त्र डागले. केवळ बृहन्मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांची दिशाभूल करण्यासाठी शिवस्मारकाचा भुलभुलैया भाजपाकडून खेळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाला असे काही उभारण्याची बिलकूल इच्छा नाही, असेही राज म्हणाले. शिवस्मारक उभारण्याच्या मुद्दय़ापूर्वी गुजरातेत वल्लभभाई पटेल यांचा लोहपुतळा उभारण्याचा मोठा गवगवा वाजपेयींकडून केला गेला होता. त्यासाठी देशभरातून लोखंड गोळा केले गेले होते. वल्लभभाईंचा पुतळा गेला कुठे? असा सवाल करत भाजपा केवळ भपका दाखवते. करत मात्र काहीच नाही. हाँगकाँगचे विमानतळ वगळता जगात समुद्रात भर घालून असा कुठलाही प्रकल्प उभारल्याचे दिसत नाही. मुळात समुद्रात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर भर घालणार कशी? विशेष म्हणजे या पुतळ्याच्या उभारण्यासाठी भाजपा सरकारने तरतूद केलेल्या साडेतीन हजार कोटींमध्ये भरावाचा खर्च तरी पूर्ण होईल का? तसा भराव टाकला तरी ज्या लाटा खडक फोडतात, त्यापासून मातीचा भराव वाचेल कसा? त्यामुळे अरबी समुद्रात शिवस्मारकाची उभारणी निव्वळ गप्पा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.