लखनौ : देशाच्या राजकारणाला कलाटणी देणार्या उत्तर प्रदेश, पंजाब व उत्तराखंडमध्ये आम्ही कोणत्याही पक्षाशी आघाडी व तडजोड न करता स्वबळावर नशीब अजमावणार असल्याची घोषणा बसप सुप्रीमो मायावती यांनी पाच राज्य विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच केली. निष्पक्षपणे निवडणूक घेण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी न मांडता तो मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मुस्लिमांनी बसपलाच मतदान करू न विजयी करावे, असे आवाहन वारंवार करणार्या मायावतींनी म्हटले की, जोरदार मोर्चेबांधणीसह स्वत:च्या हिमतीवर आणि बसप चळवळीचे हित लक्षात घेता कोणत्याही पक्षाशी आम्ही हातमिळवणी करणार नाही. याचवेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे त्यांनी स्वागत केले. या काळात अर्थसंकल्प सादर करून मतदारांना प्रलोभन दाखविले जाऊ शकते. त्यामुळे निष्पक्ष पद्धतीने निवडणूक पार पडणार नाही. म्हणून अर्थसंकल्प पुढे ढकलावा, असे मायावतींचे म्हणणे आहे. यूपीत स्वतंत्र, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणूक घेण्यासाठी सात टप्प्यांत मतदान घेणे स्वागतार्ह असल्याचे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, सत्तारूढ समाजवादी पक्ष शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करू शकतो. त्यामुळे गरीब, दीनदलित, उपेक्षित लोकांनी उत्स्फू र्तपणे मतदान करणे हे एक मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर, मोठय़ा प्रमाणावर केंद्रीय पोलीस दल तैनात करण्यात यावे व राज्य पोलिसांच्या भूमिकेवर करडी नजर ठेवावी. सर्वच पक्षांना आदर्श आचारसंहिता पाळण्याचे निर्देश देण्यासाठी तातडीची बैठक घ्यावी, असा आग्रह त्यांनी निवडणूक आयोगाकडे केला.