लोअरपरळ भागात आता पुरेशा दाबाने पाणीपुरवठा – महापौर स्नेहल आंबेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2017

लोअरपरळ भागात आता पुरेशा दाबाने पाणीपुरवठा – महापौर स्नेहल आंबेकर

मुंबई / प्रतिनिधी - लोअरपरळ तसेच चिंचपोकळी परिसरात करण्यात येत असलेला पाणीपुरवठा अपुऱया दाबाने होत होता. आता या भागात उदंचन केंद्राचे काम पूर्ण झाल्याने या भागाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांसाठी करण्यात येत असलेली कामे ही महत्त्वपूर्ण असतात, यामध्ये सुरळीत पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, पदपथ, रस्ते या विविध कामांचा समावेश असतो. ती कामेही गुणवत्तापूर्ण असल्याचे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या प्रभाग क्रमांक १९४ मध्ये ना. म. जोशी मार्गावरील जी-१ चौकी येथील उदंचन केंद्राचा लोकार्पण सोहळा काल (दिनांक ४ जानेवारी, २०१७) सायंकाळी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमास आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, नगरसेविका किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, जल अभियंता अशोक तवाडिया हे मान्यवर उपस्थित होते.

महापौर स्नेहल आंबेकर पुढे म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक १९४ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर या भागातील रस्ते, पदपथ, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, मैदाने आदी बाबींच्या पूर्ततेसाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन नागरिकांच्या सोयीसाठी विविध बाबींच्या अनुषंगाने कार्य केले आहे. लोअरपरळ, चिंचपोकळी भागात व उंच इमारतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. मात्र, ना. म. जोशी मार्गावरील जी-१ चौकी येथील उदंचन केंद्राचे काम पूर्ण झाल्याने आता प्रती मिनिटाला १८ हजार लीटर दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरविण्यात येत असलेल्या नागरी सेवा-सुविधा या गुणवत्तापूर्व व दर्जेदार आहेत. मुंबईकरांना कोणत्याही नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात कमतरता भासू नये, याकरीता आम्ही लोकप्रतिनिधींसह प्रयत्नशील असतो, असेही महापौरांनी नमूद केले.

Post Bottom Ad