अत्यावश्यक नागरी सेवा – सुविधा अबाधित रहाण्यासाठी स्थायी समितीची विशेष सभा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अत्यावश्यक नागरी सेवा – सुविधा अबाधित रहाण्यासाठी स्थायी समितीची विशेष सभा

Share This
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची विशेष सभा आज (दिनांक ५ जानेवारी, २०१७) सकाळी पार पडली. अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम ४९ (क) अन्वये महापालिका आयुक्तांनी केलेल्या विनंतीनुसार ही विशेष सभा बोलाविण्यात आली. आरोग्य खात्याच्या महत्वाच्या प्रस्तावांसह नागरी सेवा – सुविधांशी निगडित महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेण्याकरीता ही सभा आयोजित करण्यात आली होती.
आज पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेसमोर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अतिमहत्त्वाची चार कामे करण्याकरीता तातडीची मान्यता मिळावी, याकरीता स्थायी समितीला प्रशासनाकडून विनंती करण्यात आली. यामध्ये महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय / रुग्णालये, प्रसुतिगृहे ह्याठिकाणी अत्यवस्थ रुग्णांना आवश्यक असणारे ऑक्सिजन, नायट्रोजन व इतर आवश्यक वैद्यकीय गॅसचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी पुरवठादारांची दोन वर्षांकरीता नेमणूक करणे, महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय / रुग्णालयांमध्ये गुंतागुंतीच्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी मॉड्युलर ओ.टी. (शल्यक्रियागार) चा पुरवठा, उभारणी व कार्यान्वयन करणेसाठी कंत्राटदार नेमणे, पावसाळ्यापूर्वी तातडीची रस्ते दुरुस्ती व पावसाळ्यातील खड्डे दुरुस्तीची कामे करणेसाठी कंत्राटदार नेमणे,  उद्याने व मनोरंजन मैदाने ह्यांचे परिरक्षण, तातडीची दर्जोन्नतीची कामे करण्याकरीता कंत्राटदार नेमणे या बाबींचा समावेश होता.

सार्वजनिक हित लक्षात घेता तसेच अत्यावश्यक नागरी सेवा – सुविधा अबाधित रहाव्यात यासाठी या बाबींवर निर्णय तांतडीने होणे आवश्यक होते. त्याला प्राधान्य देऊन महापालिका आयुक्तांनी माननीय स्थायी समिती अध्यक्ष यांना ही विशेष सभा निमंत्रित करण्याची विनंती केली.

अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम ४९ (क) मध्ये नमूद केल्यानुसार, ‘आयुक्ताच्या मते, जे कोणतेही काम स्थायी समितीच्या पुढील सामान्य सभेपर्यंत लांबणीवर टाकता येणार नसेल, असे कामकाज पार पाडण्यासाठी स्थायी समितीचा सभापती आयुक्ताने सही केलेल्या लेखी मागणीवरुन चोवीस तासांच्या आत उक्त समितीची विशेष सभा बोलाविल.’

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages