मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे रद्द झालेली १५ लाख ४४ हजार कोटी रुपये रक्कम १६ मार्च २0१७ रोजी पुन्हा अर्थव्यवस्थेत ओतली जाईल. भारतीय स्टेट बँकेच्या साप्ताहिक अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे नोटबंदीमुळे रद्द झालेली संपूर्ण रक्कम बाजारात येण्यास अद्याप २ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. म्हणजेच जनतेला १६ मार्चपर्यंत नोट टंचाईचा त्रास सहन करावा लागणार आहे.
चलनातून रद्द झालेल्या १५ लाख ४४ हजार कोटी रुपयांपैकी साडेसात लाख कोटी रुपये चलनात आले असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली होती. १0 लाख कोटी रुपये बाजारात आल्यावर परिस्थिती नियंत्रणात येईल, असेदेखील भट्टाचार्य म्हणाल्या होत्या. जानेवारीच्या अखेरपर्यंत १0 लाख कोटी रुपये बँकेत जमा होतील, असे स्टेट बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. या नोटांचे मूल्य १५.४४ लाख कोटी रुपये होते. या दिवशी बँक आणि बाजारांमध्ये २ लाख ५३ हजार कोटी रुपये १00 आणि ५0 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात उपलब्ध होते. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या घोषणोनंतर पाचशे आणि हजारच्या १५.४४ लाख कोटींच्या नोटा चलनातून बाद झाल्या. १0 नोव्हेंबर ते १0 डिसेंबरदरम्यान एकूण ४.६१ लाख कोटींच्या नोटा चलनात आल्या. तर ११ डिसेंबर ते ३0 डिसेंबरदरम्यान ५00 आणि २000 रुपयांच्या २.२४ लाख कोटींच्या नोटा बाजारात आल्या. याशिवाय आधीच २ लाख ५३ हजार कोटी रुपये १00 आणि ५0 रुपयांच्या नोटांच्या रूपात चलनात असल्याने ३0 डिसेंबरपर्यंत बाजारात एकूण ९ लाख ३८ हजार रुपये आले आहेत. सध्या बँकांकडून दररोज ११ हजार कोटी रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या आहेत. हा वेग लक्षात घेता ३१ जानेवारीपर्यंत आणखी ३ लाख ४७ हजार कोटी रुपये बाजारात येतील. त्यामुळे बाजारातील चलन तुटवडा जानेवारीच्या अखेरपर्यंत संपेल, असे एसबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.