मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईच्या दादर येथील इंदू मिल मध्ये होणार आहे. सादर मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित झाली नसल्याने अद्याप स्मारकाचे काम सुरु करण्यात आलेले नाही. महापालिका निवडणूका डोळ्या समोर ठेवून महाराष्ट्र सरकारने इंदू मिलमधील भूखंडाच्या नियमात अखेर बदल केला असून त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनवण्यामध्ये असलेला अडसर दूर झाला आहे.
इंदू मिलमधील ४.८४ हेक्टर भूखंडामधील २.0३ हेक्टर इतक्या जमिनीला विशेष औद्योगिक क्षेत्राच्या वर्गवारीतून बाहेर काढण्यात आल्याचे आणि तो विभाग निवासी क्षेत्रात आणून हा भूखंड डॉ. आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी राखीव करण्यात आल्याचे नगरविकास विभागाने शुक्रवारी एका अधिसूचनेद्वारे घोषित केले आहे. तशा सूचना महापालिकेलाही देण्यात आल्या आहेत. पुढच्या महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून अगदी नेमक्या त्याच मुहूर्तावर हा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत. २0१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकासाठी पायाभरणी समारंभ पार पडला होता. मात्र, जमिनीवर स्मारकासंबंधात कोणतीही प्रगती काही त्यानंतर झाली नव्हती.