मुंबई : महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज असून या निवडणूका पक्ष पूर्ण ताकदीने लढवेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
जिल्हाध्यक्षांकडून आम्ही इच्छुकांची नावे मागविली असून काही ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखतीही सुरू झाल्या आहेत. निवडणुकांत स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे म्हणाले. मुंबईत काँग्रेससोबत आघाडी करण्याची आमची तयारी होती, मात्र काँग्रेसने स्वतंत्रपणो जाण्याचे जाहीर केल्याने मुंबईसाठी आम्हाला नाइलाजाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करावी लागली. या निवडणुकीत आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे. काँग्रेसने आता याबाबत पुढाकार घ्यावा, असेही तटकरे म्हणाले. मुंबई महापालिकेच्या दुसर्या यादीबाबत पक्षाचे प्रभारी जयंत पाटील, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर व मुख्य प्रवक्ते नवाब मलिक हे चर्चा करत आहेत. पुढच्या आठवड्यात दुसर्या यादीबाबत अंतिम निर्णय होईल, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.