अन्यायकारक नोटाबंदी विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2017

अन्यायकारक नोटाबंदी विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा

मुंबई / प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी जो अन्यायकारक नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यामुळे आपल्या भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली, बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली. व्यापारी वर्ग, शेतकरी, मजूर वर्ग संपून गेला. त्यांनी देशाकडे ५० दिवस मागितले होते, ते ५० दिवस संपले तरी हि देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आणि बिकट झालेली आहे. याचा निषेध म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण देशात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार आहेत. मुंबईत उद्या शनिवार, ७ जानेवारी २०१७ रोजी दुपारी १२.०० वाजता मुंबई काँग्रेसतर्फे अन्यायकारक नोटाबंदी विरोधात उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात येणार आह्रे. हा मोर्चा खेरवाडी जंक्शन ते जिल्हाधिकारी कार्यालय, बांद्रा पूर्व, मुंबई असा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, आम्ही मोर्चा काढल्यानंतर जिल्हाधिकारी यांना एक निवेदन पत्र देणार आहोत. त्यामध्ये आम्ही अशा मागण्या करणार आहोत की, सरकारने जाहिर करावे की ५० दिवसात किती काळा पैसा जमा झाला ? किती प्रमाणात भ्रष्टाचार संपला ? बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा कधी उठवणार ? देशातील संपूर्ण परिस्थिती पहिल्या सारखी पुर्वव्रत कधी होणार ? जनतेला या नोटाबंदीच्या त्रासातून कधी दिलासा मिळेल ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाच घेतली की नाही ? गरीब जनतेच्या कल्याणकारी योजना का बंद केल्या ? अशा काही प्रश्नांची उत्तरे सरकारने त्वरित जाहीररीत्या जनतेला द्यावीत असे या निवेदन पत्रात आम्ही नमूद केलेले आहे.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या अन्यायकारक नोटाबंदीच्या निर्णयामुळे घरातील माता भगिनी, गरीब जनता, मजदूर, कामगार हे सगळे अत्यंत कठिण परस्थितीत जगत आहेत. अनेक समस्या त्यांच्या समोर निर्माण झालेल्या आहेत. आपलेच कष्टाचे व काटकसर करून साठवलेले पैसे त्यांना मिळत नाहीत. बँकेतून काढता येत नाहीत. या गरीब जनतेकडे काळा पैसा आहे काय असा माझा सवाल आहे. बेरोजगारी भयंकर प्रमाणात वाढलेली आहे. हीच परिस्थिती अजून १ ते २ वर्षे राहणार आहे. देशात आर्थिक मंदी निर्माण झालेली आहे. याला पूर्णपणे नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. त्यांचा नोटाबंदीचा निर्णय संपूर्णतः फसलेला आहे. ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. म्हणून आम्ही काँग्रेसतर्फे उद्या संपूर्ण देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर विशाल मोर्चे काढून नरेंद्र मोदी आणि या भाजापा सरकारला जागे करणार आहोत. सध्याच्या बिकट परिस्थितीची त्यांना जाणीव करून देणार आहोत.

या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत बिहारचे आमदार अजित शर्मा, कर्नाटकचे आमदार रिझवान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुभाष चोप्रा, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार जनार्दन चांदुरकर, माजी आमदार बाबा सिद्दिकी, चरणसिंग सप्रा, मधु चव्हाण उपस्थित होते.

Post Bottom Ad