मुंबईची दुरावस्था हे “पाप” महापालिकेतील शिवसेना भाजपा भ्रष्ट अभद्र युतीचेच – संजय निरूपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2017

मुंबईची दुरावस्था हे “पाप” महापालिकेतील शिवसेना भाजपा भ्रष्ट अभद्र युतीचेच – संजय निरूपम

मुंबई / प्रतिनिधी / 20 Jan 2017 -
मागील २०१२ च्या महानगर पालिकेच्या निवडणुकीतील शिवसेना भाजपच्या वचननाम्यातील एक ही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही. ते संपूर्णतः अपयशी झालेले आहेत. त्यांच्या वचननाम्यात त्यांनी मुंबईकरांना मुबलक व शुध्द पाणी देण्याची घोषणा केली होती. गारगाई व पिंजाळ या प्रकल्पातून अतिरिक्त पाणी आणण्याची घोषणा केली परंतु वास्तविक पाच वर्ष गेली तरी अजून काहीही झालेले नाही अजून साधा फिजिकल रिपोर्ट हि त्यांनी तयार केलेला नाही. रुग्णांसाठी हेल्थ कार्ड देणार होते अजून कोणालाही काहीच दिलेले नाही या उलट मुंबईतील आरोग्य व्यवस्था खूपच बिकट व वाईट झालेली आहे. काल त्यांनी मराठी शाळांसाठी विशेष कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली. परंतु मुंबईतील मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ३६ शाळा बंद पडल्या आणि ४०००० विद्यार्थी शाळा सोडून गेलेले आहेत. पाच वर्ष शिवसेना भाजपा युती झोपली होती काय ? असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत विचारला. संजय निरुपम यांनी शिवसेना भाजपा युतीच्या मागील वचननाम्याची अक्षरशः चिरफाड केली.
ते पुढे म्हणाले की, मागील वचननाम्यात त्यांनी घोषणा केली होती की येत्या पाच वर्षात मुंबईत १४ उड्डाण पूल बांधणार आहोत, पण त्यांनी एक हि उड्डाण पूल बांधलेला नाही. गोराई, कांजुरमार्ग, मानखुर्द या डम्पिंग ग्राउंड मधून वीजनिर्मिती करणार होते. किती वीजनिर्मिती झाली ? असा माझा त्यांना सवाल आहे. वीज निर्मिती सोडा साधा रिपोर्ट हि तयार केलेला नाही. डम्पिंग ग्राउंडची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. पूर नियंत्रण प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यांची वचननाम्यातील एक घोषणा म्हणजे वालभाट, ओशिवरा, पोयसर, दहिसर या नद्या सांडपाणी मुक्त करणार व त्यांचे सुशोभीकरण करणार पण आजपर्यंत काहीच केलेले नाही. किती नद्यांचे सुशोभीकरण केले त्यांनी ते सांगावे.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, फेरीवाले क्षेत्र करणार होते त्याचे काय झाले या उलट हे सरकार फेरीवाल्यांच्या विरोधातील आहे. किती फेरीवाले क्षेत्र निर्माण केले यांनी आतापर्यंत मुंबईत ? फक्त महिलांसाठी आरोग्य केंद्र उभारणार होते. त्याचे काय झाले ? मुंबईत किती महिला आरोग्य केंद्र उभे राहिले आहेत ? आपत्ती व्यवस्थापन विभाग उभारणार होते तेही त्यांच्या कडून झालेले नाही. पाच वर्षात धूळ मुक्त मुंबई हि एक मोठी घोषणा त्यांच्या वचननाम्यात होती, परंतु असे काहीच झालेले नाही. मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रिकेट अकादमी उभारणार होते, ते हि करू शकलेले नाहि.

सुसज्ज व अत्याधुनिक अग्निशमन केंद्र करणार होते. महापालिकेने १३५ मजल्याच्या बांधकामाला परवानगी दिली आहे आणि अग्निशमन दलाकडे फक्त २५ मजल्यापर्यंतच आग विझविणारी शिडी उपलब्ध आहे, हाच अत्याधुनिकपणा आहे काय? बेस्टचीही अवस्था दयनीय करून ठेवलेलि आहे. बेस्ट आगारांचे अत्याधुनिकीकरण करणार होते परंतु खाजगीकरण केले. २७ बेस्ट आगारापैकी ६ बेस्ट आगार विकून टाकले. त्यांचे खाजगीकरण केले. शिवसेना नेहमी मराठी अस्मितेच्या गप्पा मारते आणि त्यांनी आपल्या वचननाम्यात घोषणा केली होती की, मुंबईत महाराष्ट्र भवन, मराठी साहित्य भवन आणि मराठी रंगभूमी भवन उभारणार. त्यांनी गेल्या पाच वर्षात एक हि कसलेच भवन उभारले नाही. हिच का त्यांची मराठी अस्मिता ? असा माझा शिवसेनेला सवाल आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

शिवसेना व भाजपा युतीने मुंबई महानगरपालिकेत २२ वर्षे सत्ता उपभोगली परंतु मुंबईची दुरवस्था करून ठेवलेली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी एक हि गोष्ट पूर्ण केलेली नाही. वचननाम्यात फक्त घोषणा करून लोकांना भुलवले. म्हणून मी आवाहन करतो की यावेळी मुंबई काँग्रेसला निर्धारपूर्वक मतदान करा. मन बदला मुंबई बदलेल. यावेळी बदल घडावा आणि काँग्रेसला निवडून द्या, असे संजय निरुपम म्हणाले.

मनपा विरोधी पक्ष नेते प्रविण छेडा म्हणाले की, शिवसेनेने काल जे जाहिर केले की मुंबईतील ५०० क्षेत्रफळ पर्यंत घरे असणाऱ्यांना मालमत्ता कर माफ करणार, हि मागणी काँग्रेसचीच जुनी मागणी आहे. आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतानाच आम्ही ही मागणी केली होती. आमच्याच मागणीची घोषणा शिवसेना आता पुन्हा करते आहे, असा त्यांनी आरोप केला.

या पत्रकार परिषदेला संजय निरुपम यांच्या सोबत मनपा विरोधी पक्ष नेते प्रविण छेडा, माजी आमदार चरणसिग सप्रा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर उपस्थित होते.

Post Bottom Ad