राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती आता एका क्लिकवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती आता एका क्लिकवर

Share This
मुंबई दि.23 : सन 2017 हे वर्ष ‘व्हिजीट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर पर्यटन विभागाकडून पर्यटकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती एकाच क्लिकवर मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून ‘टूरिझम मोबाईल ॲप’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 
मंत्रालयात या ॲपचे अनावरण करताना ते बोलत होते, यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के. एस. गोविंदराज तसेच पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मोबाईल ॲपमध्ये पर्यटकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना संबंधित पर्यटन स्थळाजवळील हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे पॅकेजची माहिती, निसर्गरम्य स्थळे, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती, ई-गाईडची सुविधा, तसेच नकाशा पाहून पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन करता येणे सोपे होणार आहे.

यावेळी रावल म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात हिमालयासारखा बर्फाच्छादित प्रदेश वगळता सर्व काही आहे, राज्याला सुंदर समुद्रकिनारा लाभला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा आहे, तसेच पुरातन काळातील लेण्या, आदिवासी संस्कृती, व्याघ्र प्रकल्प,नॅशनल पार्क, हिल स्टेशन अशी नानाविध पर्यटन स्थळे आहेत. ही सर्व माहिती एकाच ॲपमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या ॲपव्दारे रिसॉर्ट बुकिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे राज्यातील पर्यटनाला नक्कीच वाव मिळेल, असा विश्वास रावल यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages