पनवेल (प्रतिनिधी ) - 184 कोटींचा पूल,50 कोटींची पाणी योजना,47 कोटींचे काँक्रीट रस्ते,डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन,प्रशासकीय इमारत,नाट्यगृह अशी अनेक विकासकामे झालेली आहेत. पनवेलची खरी बाजारपेठ येथे आहे. तरीही विरोधक बदल हवा असा दिशाभूल करणारा प्रचार करतात त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाच्या माध्यमातून पनवेलमध्ये बदल केला आहे हे ठासून सांगा, असे रोखठोक प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. मनपाच्या प्रभाग क्रमांक 19 च्या भाजप आरपीआय युतीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. प्रभाग 19 मध्ये भाजप आरपीआय युती आघाडी घेणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजप आरपीआय युतीने प्रचारातील आघाडी कायम ठेवली असून सोमवारी (दिनांक 24 एप्रिल) रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हा सरचिटणीस नंदू पटवर्धन यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिकेच्या नव्या रचनेतील प्रभाग क्रमांक 19 च्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड,जिल्हा भाजप प्रवक्ते वाय टी देशमुख,युवा नेते परेश ठाकूर,भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,रामदास शेवाळे,जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस दर्शना भोईर,शहर महिला मोर्चा अध्यक्ष मुग्धा लोंढे,माजी सभापती अनिल भगत,राजू सोनी,माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, कल्पना ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील,प्रशांत झुंझारराव,महेश साळुंखे,स्वप्नील ठाकूर, शहर युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समेळ,भरत जाधव,अभिषेक पटवर्धन,संजय मोडक,निर्मला वैद्य यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, साई प्लाझा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करताना आ. प्रशांत ठाकूर यांनी पहिल्यांदा याच प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडणूक लढवल्याच्या आठवणी सांगितल्या. तशाच माझ्याही आठवणी जिवंत असून या परिसराचा विकास झालेला आहे. माणूस कितीही उंचावर गेला तरी आपल्या घराला विसरत नसतो त्याप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांना त्यांच्या नगरसेवक निवडणुकीची आठवण या प्रभाग कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी आली, त्याचप्रकारे प्रभागातील नागरिकांनाही आता बदल जाणवतोय. मात्र विरोधक बदल हवाय असा अपप्रचार करीत आहेत. प्रभाग 19 मधील एकजिनसी कार्यकर्ते या ढोंगी विरोधकांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत असे खणखणीत आव्हान लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले. या प्रभागातून विधानसभा निवडणुकीच्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांना8685 मते मिळाली आहेत तर शेकाप,काँग्रेसला आणि राष्ट्रवादी मिळून 5427 मते मिळालेली आहेत. 3200 मते आपल्याकडेच जास्त असून प्रभाग 19 मधील एकजिनसी कार्यकर्ते विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून येथे भाजपचे कमळ फुलवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख यांनी आपल्या मनोगतातून, शेकापची सत्ता असलेल्या पनवेल पंचायत समितीच्या कारभारावर ताशेरे ओढले. आपल्या परखड शैलीत ते म्हणाले कि,आम्ही सुरु केलेली कामे पूर्ण देखील केली मात्र शेकापने पंचायत समितीची इमारत 7 वर्षे सडत ठेवली आहे. या ठिकाणचे धनाने आणि पदाने मोठे असणारे शेकाप नेते रस्ते केल्याचा आव आणतात मात्र त्यांच्या गावात जाऊन बघा काय परिस्थिती आहे. जे स्वतःकरिता काम करू शकत नाहीत ते दुसऱ्याकरिता काय काम करणार ? असा सवालही उपस्थित केला.
रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यावेळी म्हणाले कि,ज्या शेकापचा महापालिकेलाच विरोध होता ते आता विकासाच्या गप्पा मारत आहेत. त्यांचा पर्दाफाश करण्याची कामगिरी भाजप आरपीआयला करायची आहे. विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून कमळ फुलविण्याची प्रतिज्ञा करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
युवानेते परेश ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले कि, प्रभाग क्रमांक 19 मध्येच जास्तीत जास्त कामे झाली असल्यामुळे येथील नागरिक खुश आहेत. विरोधी पक्षाला उमेदवार शोधताना धावाधाव करावी लागतेय हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचे यश आहे.
या जनसंपर्क कार्यालयामुळे एमटीएनएल रोडवर भाजपची दोन कार्यालये झाली आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात नागरिकांच्या सेवेसाठी भाजपने पुढाकार घेत जनसंपर्क कार्यालयाचे दालन उघडे केले आहे. भाजपची जनसंपर्क कार्यालये कायमस्वरूपी असतात असा नागरिकांना विश्वास असल्यामुळे येथील नागरिकांनी यानिमित्ताने आनंद व्यक्त केला आहे.
शहर वासियांची अस्मिता असलेला हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला - 2006 साली तत्कालीन नगराध्यक्षांच्या समोर पालिकेच्या निवडणुकीत उभा असताना साई प्लाझा हि इमारत माझ्या मागे किल्यासारखी उभी राहिली होती. तत्कालीन नगराध्यक्षांच्या दबावाला झुगारून सर्वानी मतदान करून जे पाठबळ दिले त्या शिदोरीवर मी नगराध्यक्ष झालो. रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कोणताही पक्षपात न करता शहरातील सर्वच प्रभागांमध्ये विकासकामे केली.सिडको शहरे वसवण्यासाठी आहे चालवण्यासाठी नाही; मात्र इथे असलेल्या ग्रामपंचायती आणि नगरपालिकेला मर्यादित अधिकारात वाढत्या नागरीकरणाची गरज पूर्ण करता येत नव्हती म्हणून मुख्यमंत्र्यांकडे महापालिकेची मागणी केली. शेकापच्या ग्रामपंचायतींनी महापालिकेला विरोध केला मात्र शहरवासीयांचा पाठिंबा आहे असे ठामपणे सांगण्यासाठी भाजपतर्फे सह्यांचे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले. न्यायालयात मुख्यमंत्र्यांनी वाढत्या नागरीकरणाला योग्य नियोजनासाठी भाजपला महापालिका निर्माण करायची आहे अशी भूमिका मांडली. शेकापला भ्रष्टाचार कण्यासाठी सत्ता हवी असते तर भाजपला पारदर्शी कारभारातून जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता हवी आहे.गेली 7 वर्षे पंचायत समितीची इमारत पूर्ण करू न शकलेले आणि झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन आमच्याजवळ करू नका म्हणणारे शेकाप नेत्यांच्या विकासाच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. अनेक स्थित्यंतरे झाल्यानंतर मनपाचा प्रभाग क्रमांक १९ आकाराला आला आहे.शहर वासियांची अस्मिता असलेला हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला आहे.संपूर्ण देशातील जनता भाजपच्या पाठीशी आहे तरीही भाजप ऊतला नाही मातला नाही घेतला वसा टाकला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्व उमेदवारांना जिंकण्यासाठी झपाट्याने कामाला लागू या.
--- आ. प्रशांत ठाकूर

No comments:
Post a Comment