पनवेल : २७ एप्रिल - पनवेल महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अनेक भागांमुळे पनवेल महापालिकेला एक बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक स्वरूप येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजपाची अधिकृत उमेदवारी देताना समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधीत्व देण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. भाजपच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेबाबत ते बोलत होते.
पनवेल महापालिकेसाठी भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार चुरस असून उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. एकूण वीस प्रभागातील ७८ जागांसाठी तब्बल सव्वा तीनशे इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये उच्चशिक्षित, पदवीधर, व्यापारी, महिला, कामगार आणि युवकांसह विविध जातीधर्मांच्या प्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. भाजपाच्या पक्षनेतृत्वावर असलेल्या विश्वासामुळेच मोठ्या प्रमाणावर इच्छुकांचा प्रतिसाद मिळल्याचे सांगत मा. आमदार ठाकूर म्हणाले की, पनवेल शहर, आसपासचा ग्रामीण भाग आणि सिडकोच्या वसाहती असा बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक भाग महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाला आहे. या क्षेत्रात देशाच्या आणि राज्याच्या विविध भागातून आलेले अनेक समाज घटक वास्तव्य करून आहेत. नोकरी व्यवसायानिमित्त इथे वास्तव्य करून असलेल्या या समाज घटकांच्याही आमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत, त्यांच्याही शहराच्या विकासाबद्दल काही सुचना आहेत. त्यांचे हेच विचार जाणून घेण्यासाठी आम्ही "आपले शहर आपला अजेंडा' ही संकल्पना राबविली. या उपक्रमाला अत्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला अाहे. ही सर्व पार्श्वभुमी लक्षात घेता उमेदवारीमध्ये स्थानिकांना भरीव प्रतिनिधीत्व देतानाच बाहेरून आलेल्या या समाज घटकांनाही योग्य प्रमाणात प्रतिनिधीत्व देण्याचा आमचा प्रयत्न असेल. कारण महापालिकेत आपलेही प्रतिनिधी असल्याचा विश्वास या प्रत्येक समाज घटकाला वाटला पाहिजे, ही त्या मागची आमची भुमिका असल्याचेही ते म्हणाले. "सबका साथ, सबका विकास' ही मा. पंतप्रधानांची घोषणा हेच आमच्या उमेदवार निवडीचे प्रमुख सुत्र असून आमच्या या भुमिकेला पनवेल महापालिकेचे मतदारही चांगला प्रतिसाद देतील , असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.