बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना हक्काची घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील - डॉ. रणजीत पाटील

मुंबई, दि. 6 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतीसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेमार्फत ‘आश्रय योजना’ व शासनामार्फत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना’ सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास करुन सेवा कालावधीत सदनिका उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतीं संदर्भात सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील नगरपालिकेतील व महानगरपालिकांमधील ज्या सफाई कामगारांची सेवा 25 वर्षे किंवा त्याहून अधिक झाली आहे, अशा सफाई कामगारांना सेवानिवृत्तींनंतर किंवा सफाई कामगारांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास, अशा सफाई कामगारांच्या पात्र वारसांना मालकी तत्वावर 269 चौरस फूट चटई क्षेत्राच्या सदनिका मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये 4 कमाल चटईक्षेत्र निर्देशांकात बांधण्यात येणाऱ्या सदनिकांपैकी 50 टक्के सदनिका सेवानिवासस्थान म्हणून व उर्वरित 50 सदनिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेंतर्गत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सफाई कामगारांना घरे उपलब्ध करुन देण्‍यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आश्रय योजना व शासनामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना राबविण्यात येत असून या योजना विहित अटी पूर्ण करण्याऱ्या सर्व सफाई कामगारांना लागू आहेत. त्यात महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाकडून बांधण्यात आलेल्या चाळींमध्ये राहणाऱ्या सफाई कामगारांचाही समावेश आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.