काळ्या यादीत टाकल्या नंतरही आर. ई. इन्फ्राला इतर कामांचे वर्क ऑर्डर -
पालिका अधिकारी आर. ई. इन्फ्रावर मेहरबान -मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबई महानगरपालिकेत नाले व रस्ते घोटाळा उघड झाल्यावर आर. ई. इन्फ्रा या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला मुंबई महानगरपालिकेचे कोणतेच काम देणे योग्य नाही. तरीही मुंबई महानगरपालिकेतील एसडब्लूडी, एसडब्लूएम, तसेच अनेक विभागांचे या कंत्राटदारावरील प्रेम उतू जात असल्याने काळ्या यादीत टाकल्यानंतरही आर. ई. इन्फ्राला अनेक कामांचे वर्क ऑर्डर देण्यात आल्याचे आरटीआय कार्यकर्ते जाहिद शेख यांनी मिळवलेल्या माहिती अधिकारातील कागदपत्रांवरून उघड झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या एसडब्लूडी (पर्जन्य जल वाहिन्या) विभागाकडून सन २०१४ मध्ये १६८ व १८२ या निविदेमधून रफी नगर, बैंगणवाडी, बाप हेरिटेज, ज्ञानसाधना हायस्कुल नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कंत्राट आर. ई. इन्फ्रा.ला देण्यात आले. याच दरम्यान मोठया नाल्यांच्या कामांमधील हेराफेरीच्या तक्रारीनंतर आयुक्त अजोय मेहता यांनी नेमलेल्या अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या चौकशी समितीने कामात भ्रष्टाचार असल्याने त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली. तसेच आयुक्त अजोय मेहता यांनी या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले होते. यामध्ये आर. ई. इन्फ्राचा समावेश आहे.
आर. ई. इन्फ्राला काळ्या यादीत टाकल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदाराला कोणतेही काम दिले जात नाही. आर. ई. इन्फ्राला काळ्या यादीत टाकल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच कामातून हद्दपार करायला हवे होते. परंतू असे काही झालेलं नाही. मुंबई महापालिकेच्या एसडब्लूडी विभागातील अधिकाऱ्यांचे आर. ई. इन्फ्रावरचे प्रेम काही केल्या कमी झाले नसल्याने १८ एप्रिल २०१५ २४ कोटी रुपयांचे मिठी नदीचे काम, १७ एप्रिल २०१७ ला १२ कोटी रुपयांचे मिठी नदी मधून गाळ काढण्याचे, २१ एप्रिल २०१५ ला ४१ कोटी रुपयांचे "एस" वॉर्ड मधील मोठे नाले दोन वर्षासाठी साफ करण्याचे काम देण्यात आले. हि सर्व कामे मुंबई महानगरपालिकेने आर. ई. इन्फ्रा कंत्राटदाराला पालिकेने काळ्या यादीत टाकल्यानंतर देण्यात आल्याचे जाहिद शेख यांनी सांगितले.
रफी नगर, बैंगणवाडी, बाप हेरिटेज, ज्ञानसाधना हायस्कुल नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कंत्राट आर. ई. इन्फ्रा.ला देण्यात आले आहे. या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. नाल्याच्या कामावेळी बिल्डरांकडून डेब्रिज विकत घेऊन तेच डेब्रिज आता नाले सफाई करणाऱ्या कंत्राटदारांना विकले जात आहे. रॅबिट उतरवणे, जागा वापरणे व पुन्हा ते रॅबिट विकणे यामधून आर. ई. इन्फ्राकडून दंड आणि शुल्क म्हणून पालिकेने २१४ कोटी रुपये वसूल केलेले नाहीत. कंत्राटदार पालिकेला करोडो रुपयांचा चुना लावत असताना एसडब्लूडीमधील पर्जन्य जल वाहिन्या, पूर्व उपनगरे विभागातील अधिकारी व एम पूर्व विभाग कंत्राटदारावर मेहरबान असल्याने मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अधिकाऱ्यांच्या कंत्राटदारावरील प्रेमाची चौकशी करावी अशी मागणी जाहिद शेख यांनी केली आहे.