मुंबई महापालिका एसडब्लूडी विभाग घोटाळा = भाग ५ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 April 2017

मुंबई महापालिका एसडब्लूडी विभाग घोटाळा = भाग ५

रफीनगर नाल्यावरील झोपड्या पात्र करण्यात भ्रष्टाचार -
झोपड्या पात्र अपात्रतेची व पुनर्वसनाची सखोल चौकशी करा - जाहिद शेख -

मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबई महानगरपालिकेच्या एसडब्लूडी (पर्जन्य जल वाहिन्या) विभागाकडून सन २०१४ मध्ये १६८ व १८२ या निविदेमधून देण्यात आलेल्या रफी नगर, बैंगणवाडी, बाप हेरिटेज, ज्ञानसाधना हायस्कुल नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कंत्राट २०१४ मध्ये आर. ई. इन्फ्रा. या कंत्राटदाराला देण्यात आले. कागदपत्रांची व बँक ग्यारेंटीची पूर्तता न करताच हे कंत्राट दिल्याचे "जेपीएन न्यूज" मधून उघड केल्यावर आपले इतर प्रकार उघड होऊ नये म्हणून कंत्राटदार आणि महानगरपालिकेने घाईगडबडीत गुरुवारी २० एप्रिल २०१७ ला रफी नगर नाल्यावरील काही झोपड्या तोडून टाकल्या. मात्र या ठिकाणच्या झोपड्या पात्र अपात्र करण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते जाहिद शेख यांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

महापालिकेच्या एम पूर्व विभागातील दुर्गा सेवा संघ व रफी नगर येथील नाला रुंदीकरणात बाधित होणाऱ्या झोपडी धारकांची पात्रता / अपात्रता निश्चित करून प्रारूप परिशिष्ठ २ (सआ/एम-पूर्व/२०१६/स.सा./ववअ.दिनांक २८/६/२०१५ ला बनवाण्यात आले. परिशिष्ठ २ मध्ये २७४ बाधित झोपडीधारकांपैकी ९१ झोपडीधारक पात्र असून १८३ झोपडीधारक अपात्र असल्याचे म्हटले आहे. या अपात्र झोपडी धारकांची सहाय्यक आयुक्त एम पूर्व यांनी १४ मार्च व ५ एप्रिल २०१६ ला सुनावणी घेऊन वास्तव्याचे पुरावे तपासल्यावर दिनांक २ /७/२०१६ ला (सआ/एम-पूर्व/३४१/ववअ) नुसार पात्रता / अपात्रता यादी मंजुरीसाठी पाठवण्यात आली. अपात्र ठरवण्यात आलेल्या झोपडीधारकांची वीज बिले रिलायंस वीज कंपनीकडे तसेच उप जिल्हाधिकारी (अति/निष्का)यांच्या कार्यालयाकडेही पडताळणी केल्याचे म्हटले आहे.

दुर्गा सेवा संघ व रफी नगर येथील नाला रुंदीकरणात २७४ झोपडीधारक बाधित होत आहेत. त्यापैकी ९१ झोपडीधारक पात्र ठरले असून १८३ अपात्र ठरले आहेत. ९१ पैकी सर्वेक्षण पडताळणीनुसार १९ व हस्तांतरण सापेक्ष १३ असे आणखी ३२ झोपडीधारक अपात्र ठरल्याने फक्त ५९ झोपडीधारक पात्र ठरले होते. पुरवणी परिशिष्ट २ क्रमांक १ प्रमाणे १८३ अपात्र झोपडीधारकांपैकी ८ झोपडी धारक पात्र ठरले. पुरवणी परिशिष्ट २ क्रमांक २ प्रमाणे २०७ अपात्र झोपडीधारकांपैकी पैकी १ झोपडीधारक पात्र ठरल्याने २०६ झोपडीधारक अपात्र ठरल्याने २७४ पैकी ६८ झोपडीधारक पात्र ठरले असल्याचा उल्लेख (सआ/एम-पूर्व/५८५/स.सा./ववअ.दिनांक २८/१२/२०१६) पत्रात असल्याचे जाहिद शेख यांनी सांगितले.

झोपडीधारकांना पात्र अपात्रता ठरवण्यात एम पूर्व विभागातील वसाहत अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याने सुरुवातीला ५९ झोपडी धारक पात्र असताना नंतर यात वाढ होऊन ६८ झोपडीधारक पात्र ठरवले गेले आहेत. झोपड्या पात्र करताना एका झोपडी धाराकांकडून ५ लाख रुपयांपर्यंत घेतले. झोडपडीधारकांना ज्या इमारतीमध्ये शिफ्टिंग केले आहे त्यासाठी एमएमआरडीएची परवानगी घेण्यात आलेली नाही. यामुळे पात्र झोपडी धारकांना घरे देण्यात आली त्या इमारतीमध्ये पाणी आणि विजेची व्यवस्था आजही नाही. वीज पाणी नसलेल्या इमारतीमध्ये झोपडीधारकांचे पुनर्वसन केले आहे. झोपड्या पात्र आणि अपात्र करण्यापासून इमारतीमधील घरे देण्यापर्यंत भ्रष्टाचार झाला असल्याने पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी जाहिद शेख यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad