लोणावळा - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाची एकाच राजकीय पक्षाच्या नेतृत्वात एकजूट होणे गरजेचे आहे. त्यासाठी रिपब्लिकन ऐक्य आवश्यक असून व्यापक निवडणुका जिंकणारा रिपब्लिकन पक्ष करण्यासाठी सर्वांचा एकच एक रिपाइं असला पाहिजे. त्यासाठी दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या मूळ रिपब्लिकन पक्षामध्ये इतर सर्व रिपब्लिकन गटांनी आपले गट विसर्जित करावेत, असा महत्त्वपूर्ण ठराव रिपाइंच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संमत झाला. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेतृत्वातील रिपाइंसुद्धा मूळ रिपब्लिकन पक्षात विसर्जित करण्यास तयार असल्याचे व त्यासाठी डॉ. राजेंद्र गवई व अन्य नेत्यांशी चर्चा करण्यास तयार असल्याचेही जाहीर केले.
लोणावळा, वळवण येथील होटल रिट्रीट येथे रिपाइंची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. त्या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. राज्यात रिपब्लिकन पक्षाला महामंडळामध्ये योग्य वाटा, सत्तेत भागीदारी देण्यात यावी, तसेच नव्याने सुरू झालेली स्थानिक स्वराज्य संस्थांमधील चार प्रभाग पद्धती छोट्या पक्षांसाठी मारक असून ती बंद करावी, असा ठरावही पारित झाला. रिपाइंच्या महाराष्ट्र राज्य कमिटी येत्या ३0 ऑक्टोबरपर्यंत जैसे थे ठेवण्यात येणार असून ऑक्टोबरमध्ये सर्व कमिटी बरखास्त करून नवीन नियुक्त्या करण्यात येतील. तोपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी भूपेश थुलकर, सरचिटणीसपदी राजा सरवदे राहतील, असे बैठकीत निश्चित करण्यात आले.
डॉ. आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीवर पुर्णा येथे झालेली दगडफेकीची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेवर कलंक ठरणारी असून याचा रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. या घटनेस जबाबदार असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. आंबेडकरी कार्यकर्त्यांवर झालेली खोट्या गुन्ह्यांची पोलीस कारवाई रद्द करावी, तसेच पोलिसांनी पुर्णा येथे सामाजिक शांतता निर्माण करावी, असाही ठराव रिपाइंच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत मंजूर करण्यात आला.
No comments:
Post a Comment