सी अँड डी परवानगीनुसार आर. ई. इन्फ्राकडून २१४ कोटी रुपयांची शुल्क व दंड वसुली नाही -
पालिका अधिकारी एसडब्लूएम विभाग आर. ई. इन्फ्रावर मेहरबान -मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबई महानगर पालिकेच्या एसडब्लूडी (पर्जन्य जल वाहिन्या) विभागाकडून सन २०१४ मध्ये गोवंडीच्या रफी नगर नाल्यावरील काम आर. ई. इन्फ्रा या कंत्राटदाराला दिले होते. या कामा दरम्यान मुंबईतील बिल्डरांच्या कामाच्या ठिकाणचे माती व डेब्रिजचे ढिगारे रफी नगर नाल्यात टाकण्यात आले. असे ढिगारे टाकताना मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेतल्याने ५६ लाख रुपयांचे शुल्क व सी अँड डी ची परवानगी न घेता बेकायदेशीर डेब्रिज आणि माती टाकल्या प्रकरणी लावण्यात येणाऱ्या दंडानुसार २१४ कोटी रुपयांचा दंड वसूल केलेला नाही. मुंबई महानगर पालिकेने असे शुल्क या आधी अँथोनी लारा व आरके मदानी या कंत्राटदारांकडून वसूल केले मग आर. ई. इन्फ्राकडून असे शुल्क व दंड का वसूल केला नाही ? मुंबई महानगरपालिका, प्रदूषण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग, कोस्टल विभाग यांनी किती रुपयांची दलाली खाल्ली असे प्रश्न आरटीआय कार्यकर्ते जाहिद शेख यांनी उपस्थित केले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या एसडब्लूडी (पर्जन्य जल वाहिन्या) विभागाकडून सन २०१४ मध्ये १६८ व १८२ या निविदेमधून रफी नगर, बैंगणवाडी, बाप हेरिटेज, ज्ञानसाधना हायस्कुल नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कंत्राट आर. ई. इन्फ्रा.ला देण्यात आले. या नाल्याचे काम करण्यासाठी नाल्याचे पाणी अडवणे गरजेचे होते. यासाठी मुंबईमधील बिल्डरांच्या कामाच्या ठिकाणच्या मातीचा कचरा, डेब्रिज आर. ई. इन्फ्रा. या कंत्राटदाराने प्रति गाडी २३०० ते २५०० रुपये घेऊन तब्बल १०७०० ट्रिप गाड्या रफी नगर नाल्यात टाकून घेतल्या. वास्तविक पाहता अश्या प्रकारे डेब्रिज. मातीचा कचरा आणून टाकण्यासाठी मुंबई महानगर पालिकेची सी अँड डीची परवानगी लागते. आर. ई. इन्फ्राने महापालिकेकडून अश्या कोणत्ययी प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे आर.टी.आय मधून उपलब्ध झालेल्या कागदपत्रातून निदर्शनास आले असल्याचे आरटीआय कार्यकर्ते जाहिद शेख यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेकडून सी अँड डी ची परवानगी न घेता बेकायदेशीर मातीचा कचरा, डेब्रिज एखाद्या ठिकाणी टाकल्यास प्रति गाडी २० हजार रुपये दंड घेतला जातो. आर. ई. इन्फ्राने १०७०० गाड्या डेब्रिज आणि माती रफी नगर नाल्यात टाकली. २० हजार रुपये प्रति गाडी प्रमाणे आर.ई. इन्फ्राकडून २१४ कोटी रुपयांचा दंड महापालिकेने वसूल करायला हवा होता. परंतू पालिकेच्या एसडब्लूएम विभागातील अधिकारी, एम पूर्व विभाग यामधील अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याने आर. ई. इन्फ्राकडून एक रुपयाही दंड वसूल केलेला नाही. तसेच मुंबई मधून ठीक ठकाणी डेब्रिज आणि मातीचा कचरा १०७०० गाड्यांमध्ये भरण्यात येऊन रफी नगर नाल्यात आर.ई. इन्फ्राचे काम सुरु असलेल्या ठिकाणी खाली करण्यात आल्या. याबदल्यात पालिकेच्या एम पूर्व विभागातील एसडब्लूएम व एसडब्लूएमच्या विभागीय कार्यालयाला या १०७०० गाड्या खाली करण्यासाठी प्रति ट्रिप ५२५ रुपये शुल्क भरावे लागते. १०७०० गाड्यांसाठी ५२५ रुपयांप्रमाणे ५६ लाख १७ हजार ५०० रुपये इतर शुल्क होते. हे शुल्कही महापालिकेने आर. ई. इंफ्राकडून वसूल केले नसल्याचे जाहिद शेख यांनी सांगितले.