मुंबई, दि. २८ - नालेसफाईतील जो गाळ काढला जातोय तो खाजगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो आहे ती ग्राउंड नेमकी कुठे आहेत? किती गाळ टाकला जातो आहे ? ज्या वजन काटयावर गाळ मोजला जातोय तो नेमका कुठे आहे? त्याची माहिती पारदर्शी पध्दतीने असायला हवी, याबाबत अद्याप पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशा सुचना करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आपण लवकरच ज्या ठिकाणी गाळ टाकला जातोय त्याही ठिकाणांची पाहणी करणार असल्याचे सांगितले.
नालेसफाईची कामे सुरू होताच महापालिकेत पारदर्शी कारभाराचा आग्रह धरलेल्या भाजपातर्फै कामांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी खार, वांद्रे, जुहू येथील गझदरबांध व परिसरातील एसएनडीटी, मेन एव्हिन्यू, नॉर्थ एव्हिन्यू, साऊथ एव्हिन्यू सह ग्रिन स्ट्रीट नाल्याची पाहणी केली. यावेळी कंत्राटदारांनी किती गाळ काढला ? तो कुठे टाकला? त्याच्या वजन काटयाच्या पावत्या ? याबाबत विचारणा आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. कंत्राटदाराने मिरा- भाईंदर येथील भारत वेथ् ब्रिज, मिरा भाईंदर वेथ् ब्रिज या दोन वजनकाटयांनी नावे सांगितली. त्यानुसार कंत्राटदाराला दोन्ही वजन काटयांना फोन संपर्क करण्यास सांगितले मात्र संपर्क झाला नाही. तर गाळ वर्सोवा येथील चेन्ना गावाजवळील खाजगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत असल्याचे कंत्राटदाराने सांगितले. त्यामुळे याबाबत पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी सोबत नगरसेविका अलका केरकर आणि वॉर्ड ऑफिसर शरद उगाडे उपस्थीत होते.
गझदरबांध हा पश्चिम उपनगरातील मोठया नाल्यांपैकी एक महत्त्वाचा नाला असून जूहू, वांद्रे, सांताक्रूझ आणि खार या भागातून येणारे चार नाले येथे एकत्र येतात व याच भागात पातमुखे आहेत. जर या नाल्याची योग्य प्रकारे सफाई केली नाही तर गझदरबांध परिसरात मोठया प्रमाणात झोपडपटटी असून पावसाचे पाणी घरांमध्ये शिरते व जुहू, सांताकुझ आणि खार बांद्रा परिसराला पुराचा धोका निर्माण होतो. म्हणूनच याच परिसरात या नाल्यावर पंपिंग स्टेशन बांधण्यात येत असून आमदार अॅड आशिष शेलार यांच्याकडून गेली दहा वर्ष त्याचाही पाठपुरवा सुरू आहे.
दरम्यान, भाजपा पारदर्शी कारभाराची आग्रही असून यावर्षी सुरूवातीपासूनच मुंबईकरांसाठी नालेसफाईच्या कामांवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. तर लवकरच आपण स्वतः ज्या ठिकाणी गाळ टाकला जात आहे असे कंत्राटदार सांगत आहेत त्या वर्सोवा येथील खाजगी डंम्पिंग ग्राऊंडवर जाऊन पाहणी करणार असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले आहे.