विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकहिताची विविध विधेयके, निर्णयांना मंजुरी - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2017

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकहिताची विविध विधेयके, निर्णयांना मंजुरी - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 7 : विधीमंडळाच्या आज संपलेल्या अधिवेशनात कृषी क्षेत्रास प्राधान्य देणाऱ्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर महत्वाची ३१ विधेयके विचारात घेण्यात आली. त्यापैकी दोन्ही सभागृहांमध्ये २२ विधेयके मंजूर झाली असून ८ विधेयके विधान परिषदेत प्रलंबित आहेत. १ विधेयक परत घेण्यात आले. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हितासाठीची तसेच शहर विकास, मुंबईचा विकास अशा विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होऊन अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीनंतर विधानभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पत्रकार हल्लाविरोधी कायदा, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासंदर्भातील विधेयक, अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करणारे विधेयक अशी महत्वाची विधेयके या अधिवेशनात संमत करण्यात आली. शेतीचे क्षेत्र हे पीककर्ज, मदत, पुनर्वसन याच्या पुढे जाणे गरजेचे आहे. त्यामुळेच शेतीमध्ये गुंतवणूक वाढवून शेतीचे क्षेत्र शाश्वत करण्यावर भर देण्यात येत आहे. अर्थसंकल्पात या भावनेनेच शेती क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. ३१ लाख शेतकरी अजुनही वित्तीय संस्थांच्या लाभ क्षेत्राबाहेर आहेत. त्यांना त्यात परत आणण्याचा शासनाचा निर्धार आहे. यावर्षी कृषी क्षेत्राचा विकास दर वाढला असून शासनाने ३० लाख क्विंटलपेक्षा अधिक तुरीची खरेदी केली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना निर्भिड आणि निष्पक्षपणे काम करता येणे शक्य व्हावे यादृष्टीनेच बऱ्याच कालावधीपासून मागणी असलेले व पत्रकारांना संरक्षण देणारे विधेयक या अधिवेशनात मंजूर करण्यात आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतीच्या पेऱ्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी प्रत्येक मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पात ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून भूसुधार, जलसंधारण, पीकपद्धती अशा विविध क्षेत्रात काम केले जाईल.

Post Bottom Ad