सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूकीचे प्रकटन जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2017

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूकीचे प्रकटन जाहीर

मुंबई दि ७ - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे प्रकटन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केले आहे. या प्रकटनात असे सांगितले आहे की, सुधारित महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कब (१) मधील तरतुदीनुसार राज्यातील सहकारी संस्था समिती सदस्यांचा व तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेण्याकरिता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे.परिणामी प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणामार्फत होणे अनिवार्य झालेले आहे. 

प्राधिकरणाने राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूका घेण्याकरिता संबंधित उप/सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था यांना प्रभाग/तालुका सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे. सुधारित अधिनियमातील कलम ७३ आय व कलम ७३ कब (१४) मधील तरतुदीनुसार विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी समितीची निवडणूक घेणे बाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अथवा जिल्हा/प्रभाग/तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांना कळवणे हे प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अत्यावश्यक कर्तव्य आहे. त्या करिता प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेने संचालक मंडळ मुदत संपण्याच्या सहा महिने आगोदर निवडणूक नियमांना संलग्न असलेल्या इ-२ नमुन्यातील माहिती संबंधित प्रभाग/तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादरकरणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम ४ नुसार २०० वा २०० पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचे “क” वर्गीकरण केलेले असून २०० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांचे “ड” वर्गीकरण केलेले आहे. “क”वर्गातील सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया नियम ७५ मधील तरतुदीनुसार किमान ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून गुप्त मतदान पद्धतीने पार पडणे अनिवार्य आहे.त्याकरिता “क” वर्गातील गृहनिर्माण संस्थांनी अचूक व पारदर्शकपणे बनवलेली इ-३ नमुन्यातील प्रारूप मतदार यादी संबंधित प्रभाग/तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. “क” वर्गातील सहकारी संस्थांची अंतिम मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मान्यताप्राप्त निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे प्रसिद्ध केली जाणार आहे.

“ड” वर्गातील गृहनिर्माण संस्थेची निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अधिमंडळाच्या विशेष सभेत गुप्त मतदान पद्धतीने पार पडणे क्रमप्राप्त आहे. तसेच “ड” वर्गातील गृहनिर्माण संस्थांनी “आय” नमुन्यातील सभासद नोंदवहीवरून कायद्यातील तरतुदींप्रमाणे,नियमानुसार व उपविधीतील तरतुदीनुसार आर्हता धारक सभासदांची प्रारूप मतदार यादी तयार करून संबंधित सभासदांच्या हरकती/आक्षेप मागवणे आवश्यक आहे.संस्थेने प्राप्ती हरकती/आक्षेपांचे निवारण करून अंतिम मतदार यादी संस्थेच्या नोटीस फलकावर प्रसिद्ध करून यादीची एक प्रत प्रभाग/तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ अअअ (३) प्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचा कालावधी पाच वर्ष एवढाच राहणार असून सदर कालावाधीनंतर संचालक पद आपोआप (Deemed) रिक्त झाल्याचे समजण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कब (१०) मधील तरतुदीनुसार विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी नवनिर्वाचित समिती सदस्यांनी पदभार घेणे अनिवार्य आहे.त्याचप्रमाणे अधिनियमातील कलम ७३ कब (१३) मधील तरतुदीनुसार प्राधिकरणाने निवडणूक निधी पोटी प्रभाग/तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे जमा करावयाची अनामत रक्कम निर्धारित करणे अनिवार्य आहे.या पार्श्वभूमीवर प्रत्येक गृहनिर्माण संस्थांनी संचालक मंडळ मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक प्रयोजनार्थ आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.

ज्या संस्था उपरोक्त नमूद बाबी संबंधित प्रभाग/तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणार नाहीत अशा संस्थांविरुद्ध अधिनियमातील कलम ७७ अ अंतर्गत संबंधित संस्थेच्या निबंधकाकडून कारवाई होऊ शकते, याच सर्व संस्थांनी नोंद घेऊन संस्थेची निवडणूक प्रक्रिया मुदतीत पूर्ण होनेकारिता आवश्यक ती उपाययोजना करावी व संस्थेचे व्यवस्थापन लोकशाही मार्गाने निवडलेल्या व्यवस्थापक समितीच्या हाती राहील याची दक्षता घ्यावी.

तसेच निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने, भयमुक्त व मोकळ्या वातावरणात, नियमानुसार पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी/प्राधिकृत अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करावे. निवडणूक संपन्न झाल्यानंतर निवडणुकीसाठी झालेल्या खर्चाचा अहवाल प्राप्त करणे, आवश्यक तेथे अनामत रक्कम परत मिळणे इ. अनुषंगाने तसेच निवडणुकीसाठी संबंधित कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासठी प्राधिकरणाच्या दूरध्वनी क्र.: ०२०-२६०५११७७ /०२०-२६०५०६४१/ ०२०-२६०५१११०/ ०२०-२६०५४१४१/ २९७०६४११या क्रमांकांशी संपर्क साधावा. असे सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

Post Bottom Ad