महाराष्ट्रातील २३ महाविद्यालयांचा समावेश
नवी दिल्ली - पुरेशी विद्यार्थी संख्या नसल्याने देशातील १२0 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये बंद झाली असून, यात महाराष्ट्रातील २३ महाविद्यालयांचा समावेश आहे. अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या आकडेवारीनुसार गतवर्षी देशातील १२२ खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रोग्रेसिव्ह क्लोजरचा पर्याय निवडला आहे. यात महाराष्ट्राच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, जळगाव आणि कोल्हापूरमधील २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. महाराष्ट्राशिवाय गुजरातमधील १५, तेलंगणातील ७, कर्नाटकातील ११, उत्तर प्रदेशातील १२, पंजाबमधील ६, राजस्थानातील ११ आणि हरियाणातील १३ महाविद्यालये गतवर्षी बंद झाली आहेत. एखाद्या महाविद्यालयाने प्रोग्रेसिव्ह क्लोजरचा पर्याय निवडल्यास ते महाविद्यालय आणखी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाहीत. आधीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच ते सुरू ठेवले जातात. पुढे जाण्यास असर्मथ असलेले खासगी महाविद्यालये एक तर प्रोग्रेसिव्ह क्लोजरचा पर्याय निवडतात किंवा महाविद्यालयाचे रूपांतर पॉलिटेक्निक किंवा सायन्स-आर्ट कॉलेजमध्ये करतात, असे परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. सरस विद्यार्थ्यांचा आयआयटी, एनआयटी आणि केंद्राकडून साहाय्य मिळणार्या संस्थांकडे कल असतो. उर्वरित विद्यार्थी खासगी महाविद्यालयांत जातात.