वेबसाईटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट - पाच आरोपींना अटक

मुंबई (जेपीएन न्यूज) - संशयास्पद वेबसाईट चालवून मुली पुरवण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणार्‍या पाच आरोपींना सायबर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दक्षिण मुंबईतून अटक केली. ही टोळी सेक्स रॅकेटच्या नावाखाली तीन बोगस वेबसाईट चालवून अनेकांची फसवणूक करत होती. वेबसाईटवर संपर्क साधणार्‍या लोकांना 'पेटीएम'द्वारे पैसे भरण्यास सांगून नंतर ते खाते डिलिट करून अनेकांची फसवणूक करत असल्याचा अनेक तक्रारी सायबर शाखेकडे आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन मशीद बंदर येथील या वेबसाईटच्या कार्यालयावर छापा टाकून पाच आरोपींना अटक करण्यात आली.

डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.सेक्सोक्लब.इन , डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.सेक्सोडेट.इन व डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.इन्स्टाक्लब.इन या संशयास्पद वेबसाईट्सचा गोपनीय तपास करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक नीता फडके व सपोनि. उमेश गौड यांचे पथक नेमण्यात आले होते. या बेकायदेशीर वेबसाईट्सच्या माध्यमातून 'पेटीएम' या पेमेंट गेटवेद्वारे होणार्‍या विविध ट्रांझ्याक्शन्सबाबत सखोल माहिती मिळवून त्याच्या आधारे दागिना बाजार मुंबादेवी स्ट्रीट येथील ज्वेलरीच्या दुकानात सापळा रचून फसवणुकीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांनी सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून त्याच्या आणखी चार साथीदारांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद कोटवाला (२४), गिरीष जैस्वाल (३३), कमल विश्‍वकर्मा (३१), अर्जुन कनोजिया (२८) व शरीफ महमद खान (२४) अशी असून त्यांच्याकडून विविध कंपन्यांची ३१0 सिम कार्ड, मोबाइल फोन व हार्डडिस्क ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या आरोपींविरुद्ध कलम ४२0, ३४ भादंविसह ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीर वेबसाईट चालवून सेक्स रॅकेट चालवणार्‍या या टोळीच्या अटकेमुळे आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत.