मुंबई - महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांकडील सरासरी ७५ टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ-कोलाय जीवाणू आढळून आले होते.तसेच एप्रिल महिन्यात महापालिका क्षेत्रातील काही भागात अतिसाराचे रुग्ण देखील आढळून आले होते.या पार्श्वभूमीवर अनधिकृत फेरीवाले / सरबत विक्रेते / खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावरील कारवाई यापूर्वीच अधिक तीव्र करण्यात आली आहे. यानुसार गेल्या काही दिवसात सर्व २४ विभागांमध्ये सुमारे १ लाख २० हजार किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
या कारवाई दरम्यान महापालिकेच्या 'एम पूर्व' विभागात सर्वाधिक म्हणजे १८ हजार ५०० किलो एवढा बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. एम पूर्व विभागामध्ये गोवंडी, देवनार, मानखुर्द, तुर्भे (Trombay), शिवाजी नगर, भारत नगर, गणेश नगर, सह्याद्री नगर, अयोध्या नगर, गौतम नगर,विष्णू नगर इत्यादी परिसरांचा समावेश होतो. या खालोखाल महापालिकेच्या 'आर दक्षिण' विभागामध्ये सुमारे ११ हजार किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. आर दक्षिण विभागामध्ये कांदिवली, पोयसर, समता नगर, आकुर्ली, राम नगर,महाराष्ट्र नगर, चारकोप इत्यादी परिसरांचा समावेश होतो. तर महापालिकेच्या 'इ' विभागामध्ये सुमारे १० हजार ८०० किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. महापालिकेच्या 'इ' विभागामध्ये भायखळा, चिंचपोकळी, डॉकयार्ड रोड, रे रोड, शिवडी, लकडी बंदर, भंडारवाडा, नागपाडा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल इत्यादी परिसरांचा समावेश होतो.