मुंबई - महापालिका आयुक्तांनी मागील वर्षापेक्षा तब्बल ११ हजार ९११ कोटी रुपयांची घट करत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी २५ हजार १४१ कोटी रुपयांचा अर्थसकंल्प सादर केला. पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘स्थायी’ समितीने आपल्या अधिकारात ३५० कोटी रुपयांची वाढ करुन अर्थसंकल्पाला शुक्रवारी (१२ मे) मंजूरी दिली. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वाढ झाल्याने आता हा अर्थसंकल्प २५ हजार ४९१ कोटी रुपयांचा झाला आहे.
स्थायी समितीने आपल्या अधिकारात अर्थसंकल्पात ३५० कोटींची वाढ केली आहे. या मधून २२७ नगरसेवकांंना प्रत्येक नगरसेवकाला एक कोटी रुपयांचा विकास निधी मिळणार आहे. उर्वरित १२३ कोटी रुपयांच्या निधीतून सत्ताधारी शिवसेनेला ४० कोटी रुपये आणि शिवसेनेच्या वचननामा पूर्ततेसाठी ३० कोटी रुपये स्वतंत्र देण्यात आले आहेत. भाजपाला ५० कोटी रुपये, मनसे, समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी चार कोटी रुपये तर काँग्रेसला १० कोटी रुपये विकास निधी मिळणार आहे. त्याचे वाटप संबंधित पक्षांचे गटनेते आपाल्या नगरसेवकांना करणार आहेत. या निधींमधून नगरसेवकांना सरासरी ५० ते ६० लाख रुपये विकास निधी मिळणार आहे. स्थायी समितीत अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर आता हा अर्थसंकल्प जून महिन्यात पालिका सभागृहात सादर केला जाणार आहे. पालिका सभागृहात यावर चर्चा करून अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात येईल.