मोदी सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या - खासदार राजू शेट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2017

मोदी सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या - खासदार राजू शेट्टी

पुणे ते मुंबई अशी आत्मक्लेष यात्रा काढणार -
मुंबई / प्रतिनिधी - केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या मालाला दर नाही, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने मोडीत काढली जात आहेत, कर्जमाफीस सरकार तयार नाही, परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, अशी गंभीर टिका करत भाजपा सरकारांना जाग आणण्यासाठी पुणे ते मुंबई अशी सोमवारपासून (दि.२२) आत्मक्लेष यात्रा काढणार आहोत, अशी घोषणा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेट्टी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

गेल्या काही महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. शेतमालाला योग्य भाव नसणे आणि नैसर्गीक आपत्ती यामुळे शेतकरी अर्धा कर्जबाजारी होतो. त्यात भाजपा सरकारे कोणत्याही शेतमालाला चांगला दर मिळू देत नाहीत. वरती शेतमालास निर्यात बंदी लादत असून परदेशातुन शेतमाल मागवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना तूर पिकवण्याचे आवाहन केले. त्यानुसार शेतकऱ्यांनी भरपूर तूर लागवड केली. यंदा तुरीचे उत्पादन भरपूर झाले. पण, सरकारने केवळ २० टक्के तूर खरेदी करुन सरसरळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा दावाही शेट्टी यांनी यावेळी केला.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोग देशात लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मोदी पंतप्रधान झाले. पण, मोदी सत्तास्थानी आल्यावर आपलाच शब्द विसरले आहेत. ते शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळत नाहीत. पंतप्रधानांनी आश्वासने पाळली असती तर देशातला शेतकरी कर्जबाजारी झाला नसता, असे शेट्टी यावेळी म्हणाले.

केंद्रातले मोदी आणि राज्यातले फडणवीस या दोन्ही सरकारांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे. भाजपा सरकारे शेतकरी कर्जमाफीची चेष्टा करत आहेत, असे म्हणत सरकारला एकतर शेतकऱ्यांची परस्थिती सुधारु द्यायची नाही किंवा किंवा शेतकऱ्यांना त्यांना फसवायचे तरी आहे, असा थेट आरोप यावेळी शेट्टी यांनी केला.

२२ मे रोजी पुण्याच्या कसबा पेठेतील महात्मा जोतीबा फुले यांच्या वाड्यापासून आत्मक्लेश यात्रा सुरु होईल. पायी प्रवास करत नऊ दिवसांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची ही यात्रा मुंबईतील राजभवन या राज्यपाल यांच्या निवासस्थानी ३० मे रोजी पोचणार आहे.

Post Bottom Ad