मुंबई - " विधानसभेत आज महाराष्ट्र वस्तू व सेवा संदर्भात विधेयक क्रंमाक 34 मांडण्यात आले आहे. हे विधेयक अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जावून मंजूर करून आणले आहे. यामुळे या विधेयकाला क्रमांक 34 न म्हणता "मातोश्री जीएसटी" विधेयक म्हणावे. असा टोला माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशुन लगावला.
यावेळी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली, 'मुख्यमंत्री वाघ्याच्या जबड्यामध्ये हात घालून दात मोजण्यात व्यस्त होते, भाजपाचे मंत्री विधेयकासाठी नाही तर, राष्ट्रपती पदासाठी उत्सुक जास्त दिसतात. त्यांना शिवसेनेच्या मतांची गरज असल्याने शिवसेनेला दुखवायचे नसल्याचे पाटील म्हणाले. मुंबईच्या अस्तित्वाला आणि मुंबईच्या सामान्य मराठी माणसाला टिकवण्याचे काम शिवसेनेला जमले नाही, कमीतकमी मुंबईमधील व्यवस्था टिकवायच्या कशा, याबद्दल तरी विचार करण्याची गरज आहे. असाही टोला जयंत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.
भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी लढत होते. मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी निघालेली भाजपा आता मुंबई महापालिकेची वॉचमन झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे मन कोणत्या कारणामुळे बदलले आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे. असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.