नवी दिल्ली : भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीचा 'एनसीईआरटी'ची पाठय़पुस्तके आणि शालेय अभ्यासक्रमात लवकरच समावेश केला जाणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी बुधवारी सांगितले. बुद्ध जयंतीच्या औचित्याने सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या समारंभादरम्यान जावडेकरांनी यासंदर्भात सांगितले.
राजकारणातून आपल्याला जीवन जगण्याची संसाधने मिळतात. मात्र, बुद्धांसारख्या महात्म्यांचे विचार जीवन का जगायचे आणि कसे जगायचे, याची दिशा आपल्याला दाखवितात. त्यामुळे त्यांचा शिक्षण प्रणालीत समावेश करणे महत्त्वाचे आहे, असे जावडेकर म्हणाले. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणात बुद्धांच्या शिकवणीचा समावेश करण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे ते म्हणाले. यामुळे शिक्षण प्रणालीस पूर्णत्व येईल, असेही त्यांनी सांगितले. बुद्धांचे विचार हे जीवनाचे विचार असून, यामुळे जीवनास योग्य दिशा मिळेल, असे जावडेकर म्हणाले. विद्यार्थ्यांना नोकरीचे कौशल्य आणि ज्ञान देणे हे शिक्षण नसून, तो त्याचा केवळ एक भाग आहे. एक चांगला नागरिक घडविणे हे शिक्षणाचे मुख्य ध्येय असल्याचेही ते म्हणाले.