मुंबई, दि. 10: विश्वाला अहिंसा, शांतीचा महान मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी प्रज्ञा, शील, करुणा या माध्यमातून शांतता नांदावी म्हणून मार्ग दाखविण्याचे कार्य केले. त्यांचाच आदर्श घेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या आधारावर समाजाला मानवमुक्तीचा मार्ग दाखविला, या रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता बंधुतेचा संदेश देशात नव्हे तर संपूर्ण जगात पोहोचावा, असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी विश्वशांती रॅलीला संबोधताना केले.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे द्वारा भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विश्वशांती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त काळाघोडा ते गेट वे ऑफ इंडिया अशी रॅली काढण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, महाथेरो राहुल बोधी, नेव्हीचे अधिकारी, एनसीसी, स्काऊट गाइड, सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थी, विविध भंतेगण, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते, नागरिक शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये सामिल झाले होते.
मंत्री बडोले म्हणाले की या रॅलीच्या माध्यमातून सर्व देशात शांततेचा संदेश जावा हा उद्देश आहे. या रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता बंधुतेचा संदेश देशात नव्हेतर संपुर्ण जगात पोहचवावा हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते ते साकार होण्यासाठी सर्वसामान्य जनतेपर्यत हा संदेश जावा. प्रज्ञा, शील, करुणेचा गौतम बुद्धांचा संदेश सर्व जगापर्यंत पोहोचावा, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.