कोलंबो : तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेली शांतता व करुणेची शिकवण आजही प्रासंगिक असून विश्व शांतीसाठी बौद्ध तत्त्वज्ञान अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले आहे. शांततेच्या मार्गात द्वेष व हिंसाग्रस्त मानसिकता एक मोठा अडथळा असल्याचे सांगत बुद्ध विचारांतूनच सामाजिक न्याय प्रस्थापित केला जाऊ शकतो. मात्र द्वेषपूर्ण मानसिकता व त्याचे सर्मथन करणारा समाज एकप्रकारे मृत्यूचे तांडव व विध्वंसक भूमिका घेत असल्याची अप्रत्यक्ष टीका त्यांनी पाकिस्तानवर केली.
आपल्या दोन दिवसीय श्रीलंका दौर्याच्या दुसर्या दिवशी नरेंद्र मोदींनी कोलंबोत आंतरराष्ट्रीय वैशाख दिनाच्या कार्यक्रमास संबोधित केले. 'समाज कल्याण व विश्वशांतीसाठी बुद्धांचा संदेश' या शीर्षकाखाली हा कार्यक्रम आयोजित झाला. यावेळी भारत व श्रीलंकेवरील बौद्ध धम्माचा प्रभाव अधोरेखित करीत ते म्हणाले की, बुद्धभूमीतून सव्वाशे कोटी जनतेच्या शुभेच्छा घेऊन मी लंकेत दाखल झालो आहे. दोन्ही देशांचे नाते जुने आहे. बुद्ध धम्म भारतातूनच लंकेत आला. सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा व पुत्र महेंद्रने लंकेत बौद्ध धम्माचा प्रसार केला. बौद्ध संस्कृतीच्या वारशाने भारत-लंक ा संबंधांत नवी ऊर्जा ओतल्याचे मोदींनी नमूद केले. याचवेळी विश्वशांतीच्या मार्गात द्वेष व हिंसक विचार सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला सजग केले. घृणास्पद मानसिकता व तिचे सर्मथन यातून विध्वंस अटळ असतो, असा अप्रत्यक्ष टोला पाकला लगावत जगाला बुद्ध व त्यांचे तत्त्वज्ञान भारताने दिले, याबद्दल आम्ही भाग्यवान असल्याचे गौरवोद्गार मोदींनी काढले. दरम्यान, या कार्यक्रमात लंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, उच्चायुक्त, नेते व जगभरातील बौद्ध उपासक तसेच भदंत मोठय़ा संख्येने उपस्थित होते. येत्या काळात लंकेच्या राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान देणार असल्याची ग्वाही मोदींनी दिली. विशेष म्हणजे, श्रीलंकेत चीन आपला हस्तक्षेप वाढवण्याचा प्रय▪करीत असतानाच मोदींनी वैशाख निमित्ताने पारंपरिक संबंध बळकट करण्यावर भर दिला आहे.