मुंबई - मुंबईत मेट्रो प्रकल्पामुळे अनेक इमारतींमधील नागरिक विस्थापित होत आहेत. मेट्रोमुळे राजकीय कार्यालयेही विस्थापित झाली आहेत. असाच मेट्रोचा फटका राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ समितीचे कार्यालयालाही बसला आहे. एक हजार चौरस फूट जागेत असलेले हे कार्यालय सध्या 325 चौरस फूट एका खोलीत सुरु आहे. यामुळे बाबासाहेबांचे ग्रंथ, दुर्मिळ कागदपत्रे खराब होण्याची शक्यता असल्याने या ग्रंथलायाचे संचालक शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावी अशी मागणी आंबेडकरी अनुयायांकडून केली जात आहे.
मुंबई मेट्रोच्या कामामुळे मंत्रालयासमोरील शासकीय बॅरॅक नं. 18 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीची कार्यालये काही दिवसांपूर्वी सरकारने सध्या ठाकरसी हाऊस, पहिला मजला, विदेश टपाल मुख्यालयासमोर, सेंट्रल बँक इमारत, ग्रँड हॉटेल शेजारी, बेलॉर्ड पियर येथे हलवली गेली. गेली 25 वर्षे याठिकाणी ही कार्यालये होती. पण त्याचे स्थलांतर करताना या कार्यालयांकडे, कार्यालयातील दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखीते, महत्वाची कागदपत्रे, मुर्ती याकडे दुर्लक्ष केले गेले. ही जागा अत्यंत अपुरी आहे. आधी समितीकडे 1000 चौरस फूट जागा होती. आता एक तृतीयांशापेक्षा कमी म्हणजे अवघी 325 चौरस फूट जागा देण्यात आलेली आहे. बाबासाहेबांचे दुर्मिळ दस्तावेज आणि पुस्तके यांचे ढीग छतापर्यंत गेलेले असून तीन संपादक व कर्मचारी यांना उभे राहायलाही जागा शिल्लक नाही. अपुऱ्या जागेत ग्रंथ समितीचे कार्यालय स्थलांतरित केल्याने त्याचा परिणाम कामावर होऊ लागला आहे.