विधानभवन येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळयास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे,विधानपरिषद सदस्या निलम गोऱ्हे, आमदार नरेंद्र पाटील, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा संदेश देत सभापती निंबाळकर म्हणाले की, संसदीय लोकशाहीतील उच्च नैतिक मूल्यांची जपणूक विधानमंडळाने नेहमीच केली आहे. सर्वसामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावणारे, राज्याच्या प्रगतीसाठी अचूक दिशा देणारे आणि पक्षीय मतमतांतरांच्या पलिकडे जावून व्यापक लोकहिताला अग्रक्रम देणारे निर्णय यापुढेही विधानमंडळाच्या माध्यमातून घेतले जातील, त्यानुरूप कायद्यांची निर्मिती केली जाईल अशी खात्री व्यक्त करुन ते म्हणाले की, विधानमंडळाने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च-एप्रिल, 2017 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा संमत करून चौथ्या स्तंभाच्या बळकटीकरणाला हातभार लावला आहे. माध्यम प्रतिनिधींना आपले कर्तव्य भय अथवा दडपणमुक्त वातावरणात पार पाडता यावे. यादृष्टीने या कायद्यातील तरतुदी निश्चितच उपयुक्त ठरतील. ग्रामीण भागातील बैलगाड्यांच्या शर्यती हा महाराष्ट्रातील एक पारंपारिक आणि चित्तवेधक खेळ आहे. ही परंपरा अबाधित रहावी यादृष्टीने अडचणी दूर करणारा कायदाही याच अधिवेशनात संमत केला, असेही निंबाळकर यांनी सांगितले.
निंबाळकर पुढे म्हणाले, कृषीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल यादृष्टीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. "जलयुक्त शिवार" अभियानाचे विधायक परिणाम आता ठळकपणे दिसत आहेत. सरकारी योजनेला लोकसहभागाची जोड मिळाली तर विकासाचा रथ किती वेगाने पुढे जाऊ शकतो, याचे ही योजना म्हणजे अलिकडच्या काळातील ठळक उदाहरण ठरावे. हुंडाबंदीचा कायदा अस्तित्वात असला तरी ही अनिष्ट प्रथा अद्यापही पूर्णत: नष्ट झालेली नाही. विवाह खर्चात काटकसर तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन यासाठी जनजागृतीची अत्यंत आवश्यकता आहे, असेही निंबाळकर यांनी सांगितले.
विधानपरिषद सभापती निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सोहळयाची सुरुवात झाली. तसेच विधापरिषद सभापती, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सुरक्षा पथकांची पाहणी केली.