मनोरे - वाहिनी उभारणीत शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 May 2017

मनोरे - वाहिनी उभारणीत शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई, 22 मे 2017 - महापारेषणतर्फे राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर 66 के.व्ही. ते 1200 के.व्ही. उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्यांनी व्याप्त जागेच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट मोबदला (रेडी रेकनर नुसार) शेतकऱ्यांना किंवा जमीन मालकांना देण्यासाठी पारेषणच्या सुधारीत नवीन धोरणाला मंत्रीमंडळाने आज मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.


या नवीन सुधारीत धोरणामुळे शेतकरी व जमीन मालकांना चांगलाच फायदा मिळणार आहे. आतापर्यंत मनोऱ्याखालील जागेच्या मूल्याच्या 25 ते 65 टक्के एवढी नुकसान भरपाई जमिनीचे प्रकारनुसार- कोरडवाहू, ओलीत, बागाईत, अकृषक जमिनीसाठी देण्यात येत होती. नवीन धोरणामुळे शेतकऱ्यांना मनोऱ्याने व्याप्त जमिनीच्या त्या-त्या भागातील रेडीरेकनर प्रमाणे होणाऱ्या मूल्यांकनाच्या दुप्पट मोबदला मिळणार आहे. तसेच वाहिन्यांखालील जमिनीचा मोबदला ही मिळणार आहे.

सध्या वाहिन्यांच्या पट्याखालील जमिनीचा मोबदला देण्यात येत नव्हता. नव्या धोरणानुसार ताराखालील जागेचा मोबदला देण्याचे सुचवण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या विद्युत मंत्रालयाने 15/10/2015 अन्वये मनोरा व पारेषण वाहिन्यांच्या व्याप्त जमिनीचा मोबदला देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या सूचनानुसार मनोऱ्याने व्याप्त जमिनीचा मोबदला जमिनीच्या मूल्याच्या 85 टक्के मूल्याप्रमाणे रेडी रेकनर नुसार देणे व पारेषण वाहिन्यांखाली जमिनीच्या मूल्यांच्या 15 टक्के मूल्याप्रमाणे रेडी रेकनर प्रमाणे देणे अपेक्षित आहे.

या नवीन सुधारीत धोरणामुळे शेतकऱ्यांना जमीन मालकांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत घसघशीत वाढ झाली आहे. शहरी भागात मोबदला देण्यासाठी अतिउच्चदाब वाहिन्यांबाबत केंद्र शासन स्तरावर समिती स्थापन करण्यात आली. मुंबई मनपा व उपनगरीय क्षेत्रातील जमिनीचे दर जास्त असल्यामुळे सुधारीत नवीन धोरण मुंबई व उपनगरे वगळून लागू राहील. अतिउच्च दाब मनोऱ्याने व्याप्त वाहिनीच्या खालील जमिनीचा मोबदला ठरवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल. भूमि अभिलेख उपअधिक्षक व तालुका/जिल्हा कृषी अधिकारी व पारेषण कंपनीचे प्रतिनिधी या समितीचे सदस्य राहतील.

जमिनीचा मोबदला शेतकऱ्याला मान्य नसेल तर तो जिल्हाधिकाऱ्याकडे अपिल करु शकेल. दिलेल्या मोबदल्याची नोंद 7/12 वर करण्यात येईल. मोबदल्याची रक्कम समान दोन टप्प्यात देण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील मोबदला मनोरा पायाभरणीनंतर व दुसऱ्या टप्प्यातील मोबदला मनोरा उभारणीनंतर देण्यात येईल. तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर देण्यात येईल. मनोरा-पायाभरणी, वाहिनी उभारताना पिकांचे व फळझाडांचे नुकसान झाल्यास दोन टप्प्यात मोबदला देण्यात येईल. ज्या जमिनीवरुन फक्त तारा गेल्या अशा ठिकाणी तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर देण्यात येईल. जमिनीच्या मालकाचा बदल झाल्यास नवीन मालक पात्र ठरणार नाही.

Post Bottom Ad