मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेली बेस्ट सध्या तोट्यात चालली आहे. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी उपक्रमाला प्रवासी संख्या वाढवावी लागणार आहे. त्यासाठी यापुढे बेस्टची भाव वाढ शेअर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरानुसार करून बेस्टपासून दूर गेलेला प्रवासी वर्ग पुन्हा बेस्टकडे वळवण्यात येतील असे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले.
बेस्टच्या प्रवाश्यांची संख्या ४३ लाख होती. हि संख्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या भाववाढीनंतर २९ लाखांवर आली आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टची अवस्था आणखी बिकट झाली आहे. बेस्टवर आधीच अनेक बँकांचे कर्ज असल्याने बँकाही बेस्टला कर्ज देण्यास पुढे येत नाहीत. मुंबई महानगरपालिकेने दिलेले कर्ज व्याजासह फेडताना बेस्टचे कंबरडे तुटले आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेवर निघत अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवासी वाढवण्यासाठी व उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचे कोकीळ यांनी सांगितले.
मुंबईत अनेक स्टेशन पासून किंवा ठराविक ठिकाणांमध्ये शेअर रिक्षा टॅक्सी चालतात. या रिक्षा टॅक्सीचे शेअरचे दर बेस्टच्या तिकिटाच्या दरापेक्षा खूपच कमी आहेत. रिक्षा टॅक्सीचे दर कमी असल्याने आणि या रिक्षा टॅक्सी त्वरित उपलब्ध होत असल्याने बेस्टने कमी अंतराचा प्रवास करणारे प्रवासी लाखोंच्या संख्येने कमी झाले आहेत. या लाखो प्रवाश्यांना आता पुन्हा बेस्टकडे वळवण्यासाठी शेअर रिक्षा टॅक्सीच्या दरापेक्षा बेस्टच्या तिकिटाचे दर कमी केले जातील. तसेच बेस्ट वेळेवर पोहचत नाही अशी प्रवाश्यांची तक्रार आहे. या तक्रारीची दखल घेत बेस्ट प्रवाश्यांच्या सेवेसाठी वेळेवर कशी पोहचेल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे कोकीळ यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून महापालिकेला कृती आराखडा सादर केला जाणार आहे. या कृती आराखड्यात सर्वात कमी अंतराचे तिकीट दर ८ रुपयांवरून १२ रुपये व इतर तिकीट दरात ४ रुपये वाढ करण्याचे प्रशासनाने सुचविले आहे. या आराखडयातील कामगारांशी संबंधित शिफारशी बाजूला ठेवून बेस्टचे उत्पन्न वाढवण्यासाठी नव्याने आराखडा बनवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. उपक्रमाने बेस्ट समितीसमोर एखादा प्रस्ताव सादर केला म्हणून तो प्रस्ताव जसाच्या तसा स्वीकारणे किंवा त्याला मंजुरी देणे समितीला बंधनकारक नाही. बेस्ट उपक्रमात समिती सर्वोच्च असल्याने बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी शेअर रिक्षा टॅक्सीच्या दरापेक्षा बेस्टचे तिकिटाचे दर कमी आकारले जातील असे कोकीळ यांनी स्पष्ट केले.
एमएमआरडीएकडे नुकसान भरपाई मागणार -
महापालिका, मुंबईत मेट्रो व इतर सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांची कामे सुरु असल्याने बहुतेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्ते खोदल्याने ट्राफिकची समस्या निर्माण झाली आहे. ट्राफिकमध्ये बस अडकल्याने प्रवाश्याना बस वेळेवर मिळत नाही. अनेक रस्त्यांवर टॅक्सी व लहान वाहनांना प्रवेश दिला जात असताना बेस्टला प्रवेश बंद करण्यात आला आहे. बसेस इतर मार्गावरून वळवाव्या लागल्या असल्याने इंधन जास्त खर्च होताना प्रवाश्यांची संख्या कमी होत आहे. बेस्टचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागल्याने बेस्टचे हे नुकसान भरून काढावे यासाठी एमएमआरडीए अधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसान भरपाई मागण्यात येणार आहे. तसेच बेस्टला बंद केलेल्या रस्त्यावरून बेस्टला पुन्हा प्रवेश देण्याची मागणी करणार आहोत.
अनिल कोकीळ - अध्यक्ष, बेस्ट समिती