शिक्षण अभ्यासक्रमाचा दर पाच वर्षांनी आढावा घेणे आवश्यक - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2017

शिक्षण अभ्यासक्रमाचा दर पाच वर्षांनी आढावा घेणे आवश्यक - मुख्यमंत्री


मुंबई, दि. 28 – साधारणपणे शहराचा विकास आराखडा दर दहा वर्षांनी करण्यात येतो, त्याच धर्तीवर बदलत्या परिस्थितीनुसार आणि शिक्षणक्षेत्रात होणारे बदल लक्षात घेता ‍अभ्यासक्रमाचा दर पाच वर्षांनी आढावा घेणे आवश्यकच असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा, नवीन विद्यापीठ कायद्यातील सुधारणा,ॲप्रेंटिशीप कायद्यातील बदलामुळे रोजगाराच्या उपलब्ध संधी अशा विविध विषयांवर राज्यातील युवा पिढीशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या प्रसारित झालेल्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन विद्यापीठ कायद्यातील लवचिकतेमुळे आता गरजेनुसार विद्यापीठांना अभ्यासक्रमांची प्रासंगिकता तपासून अभ्यासक्रमांमध्ये बदल करणे शक्य होणार आहे. विद्यापीठांमध्ये शिकविले जाणारे अभ्यासक्रम आणि उद्योगधंद्यांची आवश्यकता यात समन्वय (कनेक्ट) असणे आवश्यक आहे.

महाविद्यालयांना स्वायत्तता दिल्यास ती अधिक चांगल्या पद्धतीने विकास करु शकतात. आपले म्हणणे उदाहरणासह सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बिट्स पिलानी सारख्या संस्थांना स्वायत्त दर्जा असल्याने त्या संस्था विकास करु शकल्या. जगात जे चांगले आहे ते त्यांनी स्वीकारले. आपल्याकडे जोपर्यंत विद्यापीठ अभ्यासक्रमामध्ये बदल करीत नाही तोपर्यंत महाविद्यालयांना किंवा शैक्षणिक संस्थांना बदल करता येत नाही. सध्या तरी 10+2+3 अशा अभ्यासक्रमाच्या सूत्रात बदल करण्यात येणार नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कलमापन चाचणीमुळे योग्य ते करीअर निवडण्याचा विश्वास विद्यार्थ्यांना मिळणार -
कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांना आपला कल कोणत्या शाखेकडे आहे, आपण कोणते करीअर निवडले पाहिजे हे विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे होते. कलमापन चाचणीमुळे योग्य ते करीअर निवडण्याचा विश्वास विद्यार्थ्यांना मिळणार असून आगामी काळात कलमापन चाचणी अधिकाधिक आधुनिक केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

अभ्यासाबरोबर खेळही महत्वाचा -
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे विद्यार्थी अभ्यासात चांगला असल्यास त्याचे उत्तम करीअर होऊ शकते; त्याचप्रमाणे खेळात चांगला असल्यास त्याचे खेळातही चांगले करीअर होऊ शकते. महाराष्ट्रात चांगले खेळाडू घडावे यासाठी राज्य शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्वांसाठी शिक्षण या कायद्यानुसार शाळांना मैदान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून नोकरीमध्ये प्राधान्य दिले जात आहे. त्याअनुषंगाने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना थेट नियुक्तीही देण्यात येते.

सर्वांत अधिक ॲप्रेंटिस महाराष्ट्रामध्ये -
रोजगार आणि स्वयंरोजगार यावर उत्तर म्हणजे कौशल्य विकास असून नवीन आंतरवासिता (ॲप्रेंटिस) कायद्यामध्ये बदल करण्यात आला असल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक ॲप्रेंटिस आहेत. यापूर्वी या कायद्यामधील काही जाचक अटींमुळे कोणीही ॲप्रेंटिस ठेवायला तयार नसायचे. आता मात्र ॲप्रेंटिस कायद्यातील सकारात्मक बदलामुळे उमेदवारांना ‘हॅण्ड्स ऑन ट्रेनिंग’ मिळणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या वर्षी 69 हजार तर गेल्या वर्षी एक लाख ॲप्रेंटिस होते. आता ही संख्या वाढतच जाणार आहे. उद्योगांशी झालेल्या विविध 24 सामंजस्य करारानुसार आतापर्यंत 8 लाख तरुणांना विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 3 लाख शेतकऱ्यांच्या मुलांकरिता शेती आणि शेतीपूरक उद्योगातील प्रशिक्षण देण्यासंदर्भातील अभ्यासक्रम तयार करण्यात आला असल्याचे श्री. फडणवीस यांनी या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञानही महत्वाचे - 
आपल्या शिक्षणपद्धतीत आतापर्यंत पुस्तकी ज्ञानावरच अधिक भर देण्यात आला आहे. सध्याचा बदलता काळ आणि बाजारपेठेमधली सद्य:स्थिती याचा विचार केला असता आजच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध कंपन्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणेही तितकेच महत्वाचे आहे. राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेमुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संधी उपलब्ध होत आहेत. विविध महामंडळामार्फत शैक्षणिक कर्जही देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना शिक्षणाची गुणवत्ता आणि उपयुक्तता तपासून घेणे आवश्यक आहे.

आगामी काळात विमानवहन (ॲव्हिएशन) क्षेत्रात मोठी संधी असून या क्षेत्रामध्ये येत्या काळात विविध संधी उपलब्ध होणार आहेत. आज जशी पुण्याची ओळख ‘डेट्रॉईट ऑफ ईस्ट’ अशी आहे तशीच औरंगाबादची ओळखही उत्कृष्ट ‘ऑटो क्ल्स्टर’ म्हणून होत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Post Bottom Ad