महापालिका आयुक्तांनी केली गजधरबंध पंपिंग स्टेशनच्या कामांची पाहणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका आयुक्तांनी केली गजधरबंध पंपिंग स्टेशनच्या कामांची पाहणी

Share This
पश्चिम उपनगरातील नालेसफाई व रस्ते कामांचीही केली पाहणी -
सर्व कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार करण्याचे आयुक्तांचे आदेश -
मुंबई /प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पावसाळपूर्व कामे सध्या प्रगतिपथावर असून या कामांचा दैनंदिन आढावा महापालिका आयुक्तांच्या स्तरावर नियमितपणे घेतला जात आहे. याच अंतर्गत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज पश्चिम उपनगरातील ४ विभागांतील पावसाळापूर्व कामांची पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते व नालेसफाई कामांची पाहणी करण्यात आली. तसेच सांताक्रूज पश्चिम परिसरातील गजधरबंध उदंचन केंद्राच्या उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या पंपिंग स्टेशनची कार्यान्वयनपूर्व तांत्रिक चाचणी या महिन्याअखेरपर्यंत घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिका-यांना आजच्या दौ-यादरम्यान दिले. तसेच अंधेरी पश्चिमेतील इर्ला पंपिंग स्टेशनचीही महापालिका आयुक्तांनी आज स्वत: तांत्रिक चाचणी घेऊन तेथील पावसाळापूर्व तयारीची पाहणी केली. 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा अधिक वेगाने निचरा व्हावा, या दृष्टीने उदंचन केंद्रांची (Pumping Station) आवश्यकता असते. यानुसार महापालिकेद्वारे आतापर्यंत हाजीअली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लिव्हलँड बंदर (वरळी), ब्रिटानिया (रे रोड, भायखळा / माझगांव) व इर्ला (अंधेरी) या ५ ठिकाणी उंदचन केंद्रे उभारण्यात येऊन कार्यान्वित करण्यात आली आहेत. यापैकी अंधेरी पश्चिमेतील मोरागाव परिसरात असणा-या इर्ला पंपिंग स्टेशनला आज महापालिका आयुक्तांनी भेट देऊन तेथील पावसाळापूर्व तयारीची पाहणी केली. याअंतर्गत या पंपिंग स्टेशनची महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत चाचणी घेण्यात आली. तसेच या ठिकाणी डिझेल सह इतर आवश्यक साधन सामुग्री असल्याचीही पाहणी महापालिका आयुक्तांनी आजच्या पाहणी दौ-यादरम्यान केली.

सध्या कार्यान्वित असलेल्या ५ ठिकाणांच्या उंदंचन केंद्रांच्या व्यतिरिक्त नव्याने उभारण्यात येत असलेल्या सांताक्रूज पश्चिम परिसरातील गजधरबंध उदंचन केंद्राच्या उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या उभारणी कामांचीही महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज पाहणी केली. तसेच या पंपिंग स्टेशनची कार्यान्वयनपूर्व तांत्रिक चाचणी या महिन्याअखेरपर्यंत घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक तथा पर्जन्यजलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर यांना दिले.

आजच्या पाहणी दौ-यादरम्यान महापालिका आयुक्तांनी एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या विभागातील नाले सफाई व रस्ते कामांचीही पाहणी केली. नालेसफाईची सर्व कामे ही ठरलेल्या वेळापत्रकानुसार व सुयोग्यप्रकारे पूर्ण करावीत असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यापूर्वीच संबंधित विभागांना दिले आहेत. आज संपन्न झालेल्या पाहणी दौ-यादरम्यान महापालिका आयुक्तांसमवेत परिमंडळ ३ चे उपायुक्त वसंत प्रभू, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) संजय दराडे, महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक तथा पर्जन्यजलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages