घाटकोपर कातोडीपाड्यातील बंद असलेल्या तानसा पाईप लाईनवरील झोपड्यांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 May 2017

घाटकोपर कातोडीपाड्यातील बंद असलेल्या तानसा पाईप लाईनवरील झोपड्यांवर कारवाई


न्यायालयाच्या आदेशाची चुकीची अंमलबजावणी करत असल्याने रहिवाश्यांमध्ये संतापाची लाट -
मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर पश्चिम येथील वार्ड क्रमांक 127 कातोडीपाडामधील आंबेडकर नगर ते रामनगर मधील तानसा पाईप लाईन वरील झोपड्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी तोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली. मात्र या ठिकाणची पाईपलाईन मधून पाणी पुरवठा होत नसल्याने पालिका अधिकारी न्यायालयाच्या आदेशाची चुकीची अंमलबजावणी करत असल्याने कातोडीपाडा आंबेडकर नगर रामनगर डकलाईन रहिवासी संघ मधील स्थानिक रहिवाश्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

मुंबई महापालिकेने तानसा पाईप लाईनवरील झोपड्या तोडावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. कोर्टाच्या निर्णयानुसार "तानसाच्या चालू पाईपलाईनच्या बाजूने १० मीटरच्या परिसरातील बांधकामे" तोडावीत असा निर्णय आहे. कोर्टाच्या निर्णय हा ज्या पाईपलाईन मधून पाणी पुरवठा सुरु आहे त्या पाईपलाईन वरील झोपडया तोडण्यासाठी आहे. मात्र महानगरपालिका या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून कातोडीपाड्यातील सर्वच झोपड्याना नोटिसा बजावण्यात आल्या. या नोटिसी नुसार धडक कार्यवाही करण्यात आली आहे. या ठिकाणचे ओमकारेश्वर गणेश मंदिर कोणतीही पूर्वसूचना न देता जमीनदोस्त करण्यात आले आहे. हि कारवाई चुकीची असल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

कातोडीपाडा येथील स्थानिक रहिवाश्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती काढली असता कातोडीपाडा ते रामनगर डक या विभागातील तानसा पाईप लाईन अस्तित्वात नाही. माहिती अधिकारात पालिकेने दिलेली माहिती वेळोवेळी पालिका अधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या निरदर्शनास आणून देण्यात आली आहे. या ठिकाणी तानसा पाईप लाईन नसल्याचे माहिती अधिकारात कळवूनही याकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने कारवाई केली जात आहे. याबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही कारवाई केल्याचे कातोडीपाडा आंबेडकर नगर रामनगर डकलाईन रहिवासी संघ येथील रहिवाशी असलेले प्रवीण पाचपुते यांनी सांगितले.

दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगर पालिकेने तानसा पाईप लाईन वर असलेल्या कातोडीपाडा येथील ४०८ घरांना नोटिसा दिल्या आहेत. या घरांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे. आज ४० ते ५० झोपड्या तोडण्यात आल्या असून इतर झोपड्यावरील कारवाई या पुढेही सुरु राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

Post Bottom Ad