मुंबई - एच/पूर्व विभागातील नालेसफाई कामांची मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावंकर यांनी आज (दिनांक १७ मे २०१७) पाहणी केली. यावेळी वाकोला नदीची पाहणी करुन संथगतीने सुरु असलेल्या नालेसफाई कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. याठिकाणी अतिरिक्त यंत्रणा कार्यान्वित करुन तात्काळ गाळ काढण्याची सूचना महापौरांनी महापालिका अधिकाऱयांना केली. त्यानंतर खांडवाला कंपाऊडजवळील नाल्याची पाहणी करुन याठिकाणी अतिरिक्त जेसीबी लावून नाल्याच्या दोन्ही बाजूने तात्काळ गाळ काढण्याची सूचना महापौरांनी महापालिका अधिकाऱयांना केली. तसेच पावसाळयापूर्वी नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना महापालिका अधिकाऱयांना केली. यावेळी
महापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान मुंबई विद्यापीठ कलिना येथील नाला तसेच टीचर्स कॉलनी स्मशानभूमी जवळील नाल्याची पाहणी करुन नालेसफाई तीव्र गतीने पूर्ण करण्याची सूचना महापौरांनी संबधित अधिकाऱयांना केली. वाल्मिकीनगर, भारतनगर येथील वाकोला नाल्याची पाहणी करुन नाल्याकाठी पडले असलेले डेब्रिज हटविण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी महापालिका अधिकाऱयांना केली. त्यासोबतच कुठलेही अतिक्रमण न हटविता ज्याठिकाणी संरक्षक भिंत बांधणे शक्य आहे त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा आराखडा तयार करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी महापालिका अधिकाऱयांना केली.
वांद्रे (पूर्व) च्या रेल्वे हद्दीतील बेहरामपाडा नाल्याची पाहणी करुन याठिकाणी नाल्यात टाकण्यात येणाऱया कचऱयावर कशाप्रकारे प्रतिबंध करता येईल याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना महापौरांनी केली. वांद्रे (पूर्व) स्टेशनसमोर गेट नं १८ चमडावाडी नाल्यामध्ये नागरिकांनी अवैधपणे उभारलेल्या झोपडया तात्काळ निष्कासीत करण्याची कार्यवाही करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी महापालिका अधिकाऱयांना यावेळी केली. त्यासोबतच संबधित कंत्राटदाराकडून पावसाळयापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा लावून नालेसफाई काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना महापौरांनी महापालिका अधिकाऱयांना केली.
नालेसफाई पाहणी दौऱयाला आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, नगरसेवक चंदशेखर वायगणंकर, सदानंद परब, सगुण नाईक,दिनेश कुबल, हाजी हलीम खान, प्रज्ञा भूतकर, एच/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) गोविंद गारुळे तसेच संबधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.