मुंबई - बेकायदा फेरिवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिका खासगी संस्थांची मदत घेणार आहे. फेरिवाल्यांवर कारवाईसाठी कर्मचारी अपूरे पडू लागल्याने पालिकेने खासगी संस्थांना जाहिरातीद्वारे आवाहन केले आहे. खासगी संस्थांकडून फेरिवाल्यांवर खरंच कारवाई होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
शहरात व उपनगरातील फेरिवाल्यांवर कारवाई सुरु आहे. परंतु, काही ठिकाणी फेरिवाल्यांची संख्या अधिक आहे. यातुलनेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते. याची दखल घेऊन पालिकेने फेरिवाल्यांवर कारवाईसाठी खासगी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. लॉटरी पध्दतीन या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. अंधेरी पूर्व विभागातील बेकायदा फेरिवाल्यांवर जलदगतीने कारवाई करण्यास या संस्थांचा वापर करणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जातील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.