मुंबई - राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४0८ उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या असून, पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यामध्ये तब्बल २१७ अधिकार्यांच्या विनंतीनुसार अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ५0वर अधिकार्यांचा समावेश आहे. २१ जणांना कार्यकाळ पूर्ण होवूनही एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
सध्याच्या ठिकाणाहून बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या ४१0 हुन अधिक उपनिरीक्षकांचे विनंती अर्ज अमान्य करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ न (१) अन्वये पोलीस अस्थापना मंडळ क्रमांक दोनने राज्यातील विविध पोलीस अधीक्षक, आयुक्तालये आणि अन्य विभागातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या १९१ पीएसआयच्या बदल्या केल्या आहेत. तर त्याहून जास्त म्हणजे २१७ जणांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीसाठीचा कायर्काळ पूर्ण होवूनही वैयक्तिक, कौटुंबिक कारणास्तव सध्याच्या ठिकाणी विनंती केलेल्यापैकी २१ अधिकार्यांची विनंती मान्य करण्यात आली आहे. त्यांना कार्यरत असलेल्या ठिकाणी आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे.
मुंबईत पोलीस दलाची क्रेझ संपली -
बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या ४१0 अधिकार्यांच्या विनंती अर्ज अमान्य केलेले आहेत त्यामध्ये जवळपास निम्मे म्हणजे २00 जण हे मुंबई आयुक्तालयातील आहेत. त्यामुळे कधीकाळी 'पोस्टींग'साठी प्रयत्नशील असलेल्या मुंबईत पोलीस दलाची क्रेझ आता संपली असल्याचे स्पष्ट होते. बहुंशात पीएसआय हे २५ ते ३0 वयोगटातील असून ऐन उमेदीत त्यांना मुंबईत काम करण्याची इच्छा राहिलेली नाही. वरिष्ठ अधिकार्यांकडून दिली जाणारी वर्तुणूक, ड्युटी, बंदोबस्ताचा ताण व राजकीय दबाव आदी कारणामुळे हे तरुण अधिकारी मुंबईतून बाहेर जाण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना सध्याच्या ठिकाणी काम करावे लागणार आहे