नवी दिल्ली : पाकिस्तानी सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर केलेल्या हल्ल्यावर तीव्र चिंता व्यक्त करताना काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. मोदी सरकारकडे राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा अभाव आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. पाक सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सुरक्षा चौक्यांवर सोमवारी हल्ला करत दोन जवानांची निर्घृण हत्या केली होती.
पाकने भारत भूमीवर दोन जवानांची हत्या केली. मात्र, अशा वेळी दिल्ली मनपामध्ये मिळालेल्या विजयाचे भाजपकडून विजय पर्व साजरे केले जात आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, असे काँग्रेस प्रवक्ते कपिल सिब्बल म्हणाले. सरकारने हातातील बांगड्या काढून काही तरी करावे, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. यूपीएच्या काळात पाकने एका भारतीय जवानाचा शिरच्छेद करताना त्याच्या मृतदेहाची विटंबना केली होती. यावरून सुषमा स्वराज यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर बांगड्या भरण्याची टीका केली होती. या टीकेला अनुसरून सिब्बल यांनी मोदी सरकारवर हल्ला चढविला. यूपीए सरकारच्या तुलनेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या गत ३५ महिन्यांच्या काळात नागरिक आणि सुरक्षा जवानांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. इतकेच नाही, तर सरकारकडे जर पूर्णवेळ संरक्षणमंत्री असेल तरच त्यांना सीमा भागातील दहशतवाद्यांवर निश्चित धोरण आखता येईल, असेही सिब्बल म्हणाले. दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनीही 'टिवट्र'वरून काश्मीरमधील हिंसक स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली.