देदियापाडा : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीचे मंगळवारी रणशिंग फुंकले. सत्तारूढ भाजपला यंदा पराभवाची धूळ चारण्याचा इशारा देत त्यांनी राज्यातील आदिवासींमध्ये एकजूट करण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू केल्या आहेत. या रणसंग्रामात संपूर्ण ताकद पणाला लावू, असेही त्यांनी सांगितले.
गुजरातमधील देदियापाडा या आदिवासीबहुल भागात विराट सभेला राहुल गांधींनी संबोधित केले. यावेळी आम्ही लोकांचे म्हणणे ऐकतो. आम्हाला स्वत:चे म्हणणे सांगण्याची सवय नाही, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुचर्चित 'मन की बात' या कार्यक्रमाची खिल्ली उडविली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी व भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस मोठय़ा ताकदीने मैदानात उतरणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार येताच आम्ही लोकांचे म्हणणे ऐकू, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक टीम बनविली आहे. गेल्या ७0 वर्षांत गुजरातने लक्षणीय प्रगती केली आहे. हे यश कोण्या एका व्यक्तीचे नसून, यात काँग्रेसचाही मोलाचा वाटा आहे, असा दावा त्यांनी गुजरात दिनानिमित्त केला. दरम्यान, राज्यात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होऊ घातली आहे.
भाजपाला पराभूत करण्याचा इशारा >>आम्ही आगामी निवडणूक जिंकणार आहोत. आमच्या सरकारमध्ये सर्वांना समान स्थान राहील. 'मेक इन इंडिया' किंवा 'शायनिंग इंडिया' आदी लोकप्रिय घोषणा करण्यात मोदी पटाईत आहेत. मात्र, प्रत्यक्षात समाजातील चित्र काही वेगळेच आहे. - राहुल गांधी |