चार महिन्यात १,९९७ ठिकाणी सापडल्या डेंग्यूच्या अळ्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2017

चार महिन्यात १,९९७ ठिकाणी सापडल्या डेंग्यूच्या अळ्या

चार महिन्यात १४ लाख ३४ हजार रुपयांची दंड वसूली -मुंबई / प्रतिनिधी - डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येते. या तपासणीमध्ये १ जानेवारी ते ३० एप्रिल २०१७ या चार महिन्यांच्या कालावधी दरम्यान १ हजार ९९७ ठिकाणी 'एडिस एजिप्ती' (Aedes aegypti) या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणा-या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. तर ५७७ ठिकाणी मलेरिया वाहक 'ऍनॉफिलीस स्टिफेन्सी' (Anopheles stephensi) या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ही सर्व उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.


१ जानेवारी ते ३० एप्रिल २०१७ या चार महिन्यांच्या कालावधी दरम्यान ३३ लाख ३ हजार ८८२ गृहभेटी देखील देण्यात आल्या. यामध्ये काही घरांना गरजेनुरुप एकापेक्षा अधिक वेळा भेटी देण्यात आल्या, त्या घरांचाही या संख्येत समावेश आहे. या तपासणी दरम्यान डास नियंत्रणाच्या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित नियमांनुसार करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान चार महिन्यांच्या कालावधीत ४ हजार ७४६ नोटीसा देखील देण्यात आल्या आहेत. या नोटीसा प्रामुख्याने पाण्याची टाकी डास प्रतिबंधक नसणे, विहीर डास प्रतिबंधक न करणे, कारंजे किंवा बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी डास प्रतिबंधाच्या दृष्टीने काळजी न घेणे इत्यादी कारणांसाठी देण्यात येतात. याच चार महिन्यांच्या कालावधीदरम्यान १४ लाख ३४ हजार रुपये एवढा दंडही महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे वसूल करण्यात आला आहे, असेही नारिंग्रेकर यांनी कळविले आहे.

Post Bottom Ad